बारामती : पुढारी वृत्तसेवा : देशात 60 टक्क्यांपेक्षा जास्त राज्यात भाजपची सत्ता नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांचा कोणत्या राज्याने किती विचार केला, हे यावरून लक्षात येते. आगामी काळात हे चित्र बदललेले दिसेल. देशात राज्यकर्त्यांविरोधात वातावरण असल्याचे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले. व्हाईस ऑफ मीडियाच्या अधिवेशनात ते बोलत होते.
खा. पवार म्हणाले, 'केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, आंध— प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, दिल्ली, पंजाब, झारखंड या राज्यांमध्ये भाजप नाही. गोव्यामध्ये काही आमदार फोडले, तसेच महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंचे सरकार होते. मात्र, काहींनी वेगळी भूमिका घेतल्याने हे राज्य गेले. मध्य प्रदेशामध्ये सध्या निवडणुका आहेत. त्याचा निकाल लागेल तो लागेल. या आधी तेथे कमलनाथ मुख्यमंत्री होते. त्यांच्या नेतृत्वात राज्य होते. काही आमदार फोडले गेले आणि तिथे शिवराज चौहान यांचे राज्य आले. एकंदरीत देशाचा विचार केला असता, 60 टक्क्यांपेक्षा जास्त राज्य भाजपच्या हातात नाही. हा सध्याच्या लोकांचा कल आहे.'
आगामी काळात होणार्या निवडणुकीचा निकाल काय असेल, हे आज सांगणे योग्य नाही. मात्र, देशात बदल स्पष्ट दिसत आहे. दिल्लीत बसलेले जे सत्ताधारी आहेत, त्यांच्या विचारांचे मत आज लोक व्यक्त करीत नाहीत. ही स्थिती आज झाली आहे. या सगळ्या स्थितीमध्ये लोकांमध्ये अस्वस्थता आहे. ती मांडण्याचे एकमेव साधन म्हणजे पत्रकारिता आहे. हे साधन प्रामाणिकपणे वापरावे, असे आवाहन पवार यांनी केले.
देशातील माध्यमांशी स्थिती बदलली आहे. पत्रकाराला स्वतःचे मत मांडायला, भूमिका घ्यायला वाव कमी आहे, असे वातावरण आहे. सत्य आणि योग्य असेल, तर मांडा पण कुणाच्या सूचनेवरून भूमिका ठरवू नका. सामान्यांच्या अपेक्षेचे ओझे पत्रकारितेवर आहे. हा जो 'व्हॉईस' आहे तो दुबळा होऊ देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकारितेची परंपरा मोठी असल्याचे सांगितले.
हेही वाचा