पुणे : उन्हामुळे फळभाज्यांची आवक घटली

पुणे : उन्हामुळे फळभाज्यांची आवक घटली

पुणे : उन्हाच्या कडाक्यामुळे रविवारी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमधील तरकारी विभागात फळभाज्यांची आवक एरवीच्या तुलनेत दहा ट्रकने कमी राहिली. बाजारात राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे 80 ते 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. बाजारात दाखल झालेल्या मालाच्या तुलनेत मागणी जास्त राहिल्याने कांदा, फ्लॉवर, घेवड्याच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली. तर मागणी अभावी भुईमूग शेंग, शेवगा, टोमॅटोच्या भावात घट झाली. मागणी व पुरवठा यातील समतोलामुळे इतर सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेने स्थिर होते.

परराज्यांतील कर्नाटक, गुजरात येथून सुमारे 8 ते 10 टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटकमधून 5 ते 6 टेम्पो तोतापुरी कैरी, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून 4 ते 5 टेम्पो शेवगा, गुजरात, कर्नाटक येथून 3 ते 4 टेम्पो कोबी, कर्नाटक येथून घेवडा 3 टेम्पो, हिमाचल प्रदेश येथून मटार 5 ते 6 ट्रक मटार, तर मध्य प्रदेश येथून लसूण सुमारे 8 ते 10 टेम्पो इतकी आवक झाली.

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 800 ते 900 गोणी, भुईमुग शेंग 200 गोणी, काकडी 7 ते 8 टेम्पो, भेंडी 7 ते 8 टेम्पो, गवार 5 ते 6 टेम्पो, हिरवी मिरची 4 ते 5 टेम्पो, सिमला मिरची 8 ते 10 टेम्पो, कोबी 4 ते 5 टेम्पो, फ्लॉवर 8 ते 10 टेम्पो, गाजर 5 ते 6 टेम्पो, गावरान कैरी 100 गोणी, तांबडा भोपळा 8 ते 10 टेम्पो, कांदा 70 ते 80 ट्रक, इंदूर, आग्रा आणि गुजरात भागातून बटाटा 25 ते 30 ट्रक इतकी आवक झाली.

कोथिंबीर, शेपू, कांदापात, चाकवत, पुदिन्याच्या भावात घट

मार्केटयार्डमध्ये रविवारी पालेभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेने किंचितशी वाढली होती. मागणी कमी झाल्याने घाऊक बाजारात कोथिंबीरच्या शेकडा जुडींच्या भावात 500, शेपू 500, कांदापात 100, चाकवत 100, पुदिन्याच्या भावात 100 रुपयांनी घट झाली होती. तर, आवक घटल्याने अंबाडीच्या शेकडा जुडीच्या भावात 100 रुपये, चुका 200, चवळई 100 रुपयांनी वाढ झाली होती. इतर सर्वच पालेभाज्यांचे भाव स्थिर होते. मार्केट यार्डात रविवारी कोथिंबिरीची 1 लाख 50 हजार जुडींची आवक झाली, तर मेथीची 50 हजार जुडी इतकी आवक झाली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news