

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : सध्या उन्हाचा पारा 42 अंशावर आलेला आहे. पहावे तिकडे लाही लाही करणारे ऊन. मात्र, रणरणत्या उन्हाच्या ग्रीष्म ऋतुमध्ये बहरलेल्या फुलांनी डोळ्यांना आल्हाददायक वाटत आहे. वसंत ऋतुनंतर येणारा काळ म्हणजे ग्रीष्म ऋतू या काळात अनेक प्रकारची फुले फुलतात आणि सृष्टीवर रंगांची उधळण करतात. बहावा आणि गुलमोहर हे मे महिन्यात फुलणारे झाड आणि त्याआधी येणारा पिवळा धम्मक बहावा भरभरून बहरला, की पहातच रहावेसे वाटते! रस्त्याकडेने, बंगल्यांच्या
आवारात थाटात उभ्या असलेल्या या वृक्षांनी रणरणत्या उन्हात थंडावा मिळत आहे.
गुलमोहराची लाल, किरमिजी किंवा नारिंगी रंगाच्या अतिसुंदर फुलोर्यांनी पानांशी साधलेली विरोधी रंगसंगती डोळ्यांचे पारणे
फेडणारी असते. लाल गुलमोहर आणि निळा, जांभळा जॅकरांडा याला नीलमोहर किंवा कॅशियादेखील म्हणतात. निळ्या-जांभळ्या, नाजूक, फुलांच्या तुर्यांनी हा वृक्ष डोलत आहे.
गुलाबी फुलांचा रेन ट्रीसुद्धा सुंदर, नाजूक गुलाबी फुले यायला सुरुवात वसंत ऋतूतच होते आणि जूनपर्यंत हा फुलत राहतो. रावेत बीआरटी परिसरात रस्त्याच्या कडेने लावलेली हे वृक्ष फुलांनी बहरल्यावर शहराच्या सौंदर्यांत भर टाकत आहेत.याबरोबरच पिवळ्या रंगाचा कृष्णलीला, पांढर्या, फिकट गुलाबी व गडद रंगाची बोगनवेल यांसारख्या फुलांनी रंगाची उधळण केली आहे.