पुणे: मुसळधार पावसाने शहरातील प्रदूषित हवा शुद्ध गटात आली आहे. उन्हाळ्यात मर्यादेबाहेर गेलेले प्रदूषण पूर्ण आटोक्यात आले असून, हवेची गुणवत्ता शुद्ध गटात परत आली आहे. मार्च ते एप्रिल या दोन महिन्यांत हवेची गुणवत्ता 180 ते 220 मायक्रोग्रॅम प्रतिक्युबिक मीटर इतकी होती. ती 19 मे रोजी चक्क 40 ते 48 पर्यंत खाली आली आहे.
शहरातील हवाप्रदूषण हे यंदाच्या उन्हाळ्यात मुंबईपेक्षा जास्त वाढले होते. दिल्लीनंतर पुणे शहरात हवाप्रदूषणाचा उद्रेक झाला होता. शहरातील कर्वे रस्त्यावर 177.6 टक्क्यांनी वाढ झाली होती. 3 मे रोजीची ही ताजी आकडेवारी होती. मार्च ते एप्रिल या दोन महिन्यांत शहराचा पारा 40 ते 42 अंशांवर होता. त्यात हवाप्रदूषण शिगेला पोहोचले होते. (Latest Pune News)
...येथील हवाही होती प्रदूषित
कर्वे रस्त्यासह आळंदी रस्ता, कोथरूड, म्हाडा कॉलनी, हडपसर, निगडी, शिवाजीनगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, पाषाण या भागातील हवेची गुणवत्ता सतत अतिप्रदूषित गटात होती. यात प्रामुख्याने सूक्ष्मधूलिकण (पी.एम.10) या धूलिकणांचे प्रमाण खूप म्हणजे 100 ते 177 टक्के इतके वाढले होते. शहराच्या हवेची गुणवत्ता (एक्यूआय) खूप खाली खराब गटात पोहोचली होती.
मुसळधार पावसाने हवा शुद्ध
मान्सूनपूर्व पाऊस शहरात जोरदार कोसळत असून, जणू हा मान्सून बरसतोय, असाच तो रोज पडत आहे. शहरात मे महिन्यात तब्बल 183 टक्के जास्त पाऊस झाला आहे. मे महिन्याची सरासरी 11.5 मि. मी. इतकी आहे. मात्र, 18 मेपर्यंत शहरात 60.7 मि. मी. पाऊस झाला. त्यात सोमवारच्या पावसाची मोठी भर पडली. सतत सुरू असलेल्या पावसामुळे शहराची प्रदूषित हवा शुद्ध गटात गेली आहे. हवेची गुणवत्ता 160 ते 220 इतकी होती ती चक्क 40 ते 48 मायक्रोग्रॅम प्रतिक्युबिक मीटर इतकी खाली आली आहे.