

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या वतीने विक्रमी वेळेत तयार करण्यात आलेले आणि त्याबद्दल केंद्राचा पुरस्कार मिळालेले सुदर्शननगर, पिंपळे गुरवमधील 8 टू 80 पार्कची वर्षाच्या आतच दुरवस्था झाली आहे. हलक्या दर्जाचे ओपन जीमचे व इतर साहित्य तुटत आहेत. सर्वत्र कचर्याचे ढीग साचले. देखभालीअभावी रोपे सुकून गेली आहेत. आठ वर्षाच्या बालकांपासून ते 80 वर्षांच्या वृद्धांपर्यंत सर्वांना वापरता यावा, या संकल्पनेतून या पार्कची निर्मिती करण्यात आली आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त स्मार्ट सिटीने विक्रमी 75 तासांमध्ये पार्क तयार केले. तत्कालीन महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते 26 जानेवारी 2022 ला पार्कचे उद्घाटन झाले. रात्री साडेदहापर्यंत ते खुले असल्याने या पार्कला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतो.
नागरिक व मुले ओपन जीमवर व्यायाम करतात. महिलाही मोठ्या संख्येने जीमचा वापर करतात. जीमचे बहुतांश साहित्य तुटले आहे. तसेच, घसरगुंडीला मोठे भोक पडले आहे. दुरुस्तीनंतरही साहित्य वारंवार तुटत असल्याचे त्याच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केली जात आहे. व्यायाम व खेळण्यासाठी साहित्याचा वापर करता येत नसल्याने नागरिकांसह बालगोपाळांचा हिरमोड होत आहे.
नियमित स्वच्छता केली जात नसल्याने मुलांच्या गेम झोनमध्ये तसेच, वॉकिग ट्रॅकवर सर्वत्र वाळू पसरल्याने चालताना नागरिक विशेषत: ज्येष्ठ नागरिक व महिला पाय घसण्याचा धोका आहे. हॅगिंग लिटर बिन्समध्ये कचरा भरून वाहत आहे. जागोजागी गुटखा खाऊन पिचकार्या मारल्या आहेत. देखभालीअभावी रोपे सुकून चालली आहेत. लोखंडी संरक्षक कठड्यामध्ये अधिक फट असल्याने लहान मुले धोकादायकरित्या आत-बाहेर प्रवेश करू शकतात. परिणामी, अपघाताची शक्यता आहे.
सी-सॉ, साप शिडीचा रंग उडाला आहे. व्हिविंग टॉवरची जाळी कमकुवत असून, ते पुन्हा तुटले आहे. पार्कमध्ये आता गाणी लावली जात नाहीत. सुशोभीकरणासाठी लावलेले फलक तुटले आहेत. पार्कमध्ये पिण्याची पाणी व स्वच्छतागृहाची सोय नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. पार्कमध्ये सायकल व दुचाकी घेऊन टवाळ मुले फिरत असल्याने अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.
पार्कमधील हलक्या दर्जाचे ओपन जीमचे साहित्य तुटले आहे. त्याची दुरुस्ती केल्यानंतर ते पुन्हा तुटण्याचे प्रकार घडत आहेत. तुटलेल्या या साहित्यामुळे खेळताना लहान मुलांसोबत दुर्घटना घडण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच, टवाळ मुलांमुळे कुटुंबासह येणारे नागरिक रोष व्यक्त करीत आहेत.
8 टू 80 पार्कमधील साहित्य तुटले आहेत. तसेच, नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्याबाबत तातडीने दखल करून उपाययोजना करा, असे सक्त सूचना माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी स्मार्ट सिटीच्या अधिकार्यांना दिल्या होत्या. मात्र, त्यावर काहीच कार्यवाही झाली नसल्याचे धक्कादायक चित्र आहे.
स्मार्ट सिटीच्या ठेकेदाराकडे या पार्कची जबाबदारी आहे. तेथील दैनंदिन साफसफाई, सुरक्षा व दुरुस्तीसंदर्भात त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. लवकरच सर्व दुरुस्ती काम पूर्ण केले जाईल. त्यानंतर महापालिकेच्या उद्यान विभागाकडे हस्तांतरीत केले जाईल, असे स्मार्ट सिटीचे कार्यकारी अभियंता मनोज सेठिया यांनी सांगितले.