सुषमा नेहरकर- शिंदे
राजगुरुनगर: खेड तालुक्यातील रोहकल ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गायरान जमिनीवर गेले शंभर वर्षांपासून शंभर - दीडशे ठाकर कुटुंबे वास्तव करत आहेत, परंतु जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी एक आदेश काढून ही संपूर्ण 39 एकर जमीन पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाला (म्हाडा) वर्ग करून टाकली आहे.
खेड तालुक्यातील चाकण औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या रोहकल ग्रामपंचायतीची तब्बल 15.76 हेक्टर (39 एकर ) गायरान जमीन आहे. कोट्यवधी रुपयांचे मूल्य असलेल्या या जागेवर खासगीसह सरकारी अनेक यंत्रणेचा सुरुवातीपासूनच डोळा आहे. याच जागेत रोहकल गावातील तब्बल 100-150 ठाकर समाजाची आदिवासी कुटुंबांची पाचवी पिढी वास्तव्य करत आहे.(Latest Pune News)
या जागेत या लोकांची पक्की घरे असून, शासनाने सर्व सोयी-सुविधा देखील पुरवल्या आहेत. याशिवाय गेल्या काही वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने सामाजिक वनीकरण विभागाने या गायरान जागेवर तब्बल साडेतीन हजारांहून अधिक देशी वृक्षांची लागवड करून येथे अतिशय छान जंगल निर्माण केले आहे.
या सर्व वस्तुस्थितीचा जागेच्या पंचनाम्यात उल्लेख केला असताना पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हे संपूर्ण गायरान पुणे ’म्हाडा’ला घरे बांधण्यासाठी वर्ग केले आहे. पुणे म्हाडाचा घरे बांधण्यासाठी रोहकलचे गायरान मिळावे यासाठी अर्ज आल्यानंतर अतिशय तत्परता दाखवत महसूल यंत्रणेकडून सर्व कारवाई पूर्ण करून तातडीने ही जागा ’म्हाडा’ला वर्ग देखील केली.
याच जागेत ठाकर समाजाला व गावातील काही गरजू कुटुंबांना घरकुल बांधण्यासाठी गेले अनेक वर्षांपासून मागणी असताना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून केराची टोपली दाखवली जाते, ही वस्तुस्थिती आहे.
रोहकल ग्रामपंचायत चाकण औद्योगिक वसाहतीलगत असल्याने मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढत आहे. भविष्यात सार्वजनिक नागरी सुविधा निर्माण करण्यासाठी जागेची गरज आहे. गावातील ठाकर समाजाची कुटुंबं गेले शंभर वर्षांपासून या गायरान जागेत राहात आहेत. याशिवाय गावातील अनेक भूमिहीन लोकांना घरकुल बांधण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे जागेची मागणी केली आहे. आम्ही या जागेत तब्बल साडेतीन हजार देशी वृक्ष लावून जंगल निर्माण केले आहे. या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून जिल्हाधिकारी यांनी आमचे संपूर्ण गायरान पुणे ’म्हाडा’ला वर्ग केले. याला ग्रामपंचायतीचा तीव्र विरोध असून, एक इंचही जागा पुणे ’म्हाडा’ला देऊ देणार नाही.
- प्रमिला संदीप काचोळे, सरपंच, रोहकल , खेड
मी 80 वर्षांचा असून, आमची चौथी पिढी या जागेत राहतोय. आम्हाला शेतजमीन नसल्याने परिसरातील शेतक-यांकडे मोलमजुरी करून आम्ही पोट भरतो. आमची गुरे, शेळ्या- मेढ्या, कोंबड्या आमच्या रोजीरोटीचा भाग आहे. आता आम्हाला आमच्या हक्कांच्या जागेतून उठविण्याचा डाव टाकला जात असून, आमची जागा ’म्हाडा’ला देऊन टाकली आहे. आमची शंभर- दीडशे कुटुंबं यामुळे रस्त्यावर आली आहेत.
- पांडुरंग मोतीराम खंडागळे