

आळेफाटा: आळेफाटा (ता जुन्नर) येथील लक्ष्मी एंटरप्राइजेस या किराणा दुकानाचे रखवालदारास मध्यरात्री नंतर कारमधून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी धमकावून जबर मारहाण करत उचलून दुसऱ्या ठिकाणी नेत सोडले. यादरम्यान इतर अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश करत रोख रकमेसह जवळपास पावणेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली.
याबाबत माहिती अशी आळेफाटा चौकापासून हाकेच्या अंतरावर नाशिक बाजुचे रस्त्याचे बाजुला सुरेश भगवान खांडगे यांचे लक्ष्मी एंटरप्रायझेस हे किराणा मालाचे दुकान आहे. आज अडीच वाजेच्यासुमारास तेथे एक कार आली त्यामधील चार जणांपैकी दोघे खाली उतरून तेथील रखवालदार जगदीश गणेश ततवा यास धमकावत मारहाण करून कारमध्ये बसवले व पुढे कार घेऊन गेले. रखवालदाराचे डोळ्यावर पट्टी बांधून त्यास परिसरातच फिरवत मोबाईलवरून बोलत राहिले. (Latest Pune News)
यानंतर त्यांचेशी संबंधित दुसरे अज्ञात चोरटे तेथे आले त्यांनी दुकानाचे शटर्स उचकटुन आतमध्ये प्रवेश करत दुकानाचे काउंटरमध्ये ठेवलेले 50 हजार रूपये व सुमारे 2 लाख 20 हजार रूपये किंमतीच्या सिगारेट असा पावणेतीन लाख रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. यानंतर काही वेळाने या रखवालदार ततवा यास पुन्हा जबर मारहाण करत त्यास पुणे नाशिक महामार्गावरील बोटा (ता संगमनेर) परिसरात सोडून दिले.
कारमध्ये एकूण चौघेजण होते व ते मला मारहाण करत मोबाईलवरून बोलत असल्याचे जखमी जगदीश ततवा यांनी सांगितले. त्यास उपचारासाठी आळेफाटा येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले असून मारहाणीत त्याचा खांदा निखळला आहे. सुरेश खांडगे यांचे फिर्यादीवरुन आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेची दखल घेत पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांनी तपास सुरू केला आहे.