चाकण पंचक्रोशीत कुत्र्यांची दहशत; एकाच दिवसात चौघांना चावा 

चाकण परिसरात जागोजागी असे भटक्या कुत्र्यांचे कळप पाहावयास मिळत आहेत.(छाया :अविनाश दुधवडे)
चाकण परिसरात जागोजागी असे भटक्या कुत्र्यांचे कळप पाहावयास मिळत आहेत.(छाया :अविनाश दुधवडे)
Published on
Updated on

चाकण : चाकण आणि पंचक्रोशीतील गावांमध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये अनेक नागरिक जखमी होत आहेत. चाकण, मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, खराबवाडी भागात भटक्या कुर्त्यांकडून लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांवर हल्ले होत आहेत. चाकण येथे दशक्रिया विधीसाठी जाणार्‍या चार जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. चाकण पालिकेसह लगतच्या ग्रामपंचायत प्रशासनांनी मोकाट कुर्त्यांबाबत तातडीने उपाययोजना करण्याची
मागणी होत आहे.

खेड तालुक्यात मागील महिनाभरात 146 जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या प्रशासनाकडे नोंदी आहेत. संपूर्ण चाकण पंचक्रोशीत भटकी कुत्री, डुकरांची दहशत असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. मागील काही दिवसांत भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली असून, यावर नियंत्रण मिळविण्यामध्ये चाकण पालिका प्रशासन आणि लगतच्या ग्रामपंचायती प्रयत्नच करीत नसल्याची नागरिकांची खंत आहे. भटक्या श्वानांच्या उपद्रवामुळे अनेक बालके, नागरिक जखमी झाल्याच्या घटना चाकण आणि लगतच्या वाड्या-वस्त्यांच्या भागांमध्ये वारंवार घडत आहेत. चाकण शहरात शेकडो भटकी कुत्री असून, ही संख्या वाढतच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मागील काही वर्षांत चाकण परिसराचा चारही दिशांना झालेला विस्तार, यामुळे नागरिकरणात मोठी वाढ झाली आहे. रस्त्यावर सर्रास लावले जाणारे खाद्यपदार्थ व चायनीजचे स्टॉल्स तसेच अनेक ठिकाणी हॉटेलमधील अन्नपदार्थ रस्त्यावरच टाकले जात असल्याने ते खाण्यासाठी अनेक भटकी कुत्री गोळा होतात. सकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडलेले नागरिक तसेच रात्रीचे जेवण झाल्यानंतर फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांवर रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना समोर येत आहेत.

महापालिकांचा प्रताप !
चाकणलगतच्या पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून चाकण-आळंदी रस्त्यावरील वनहद्दीत भटकी कुत्री आणून सोडली जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. याबाबत पिंपरी-चिंचवड पालिकेला सर्वपक्षीयांकडून निवेदन देण्यात येणार असून, स्थानिक पालिकेने उपाययोजना सुरू न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असे चाकणचे माजी उपसरपंच कालिदास वाडेकर, अशोक बिरदवडे, बाजार समितीचे संचालक राम गोरे, युवा सेनेचे नितीन गोरे, चाकण सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब पठारे, संचालक बाबाजी राक्षे, काँग्रेसचे जमीर काझी, बाळासाहेब गायकवाड, अ‍ॅड. नीलेश कड, राष्ट्रवादीचे मुबीन काझी यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news