

दिगंबर दराडे
पुणे : 'खंडेरायाची जेजुरी' म्हणून ओळखल्या जाणार्या श्री क्षेत्र जेजुरी गड (ता. पुरंदर, जि. पुणे) या तीर्थक्षेत्राच्या विकासाकरिता 109.5796 कोटीच्या विकास आराखड्यास मान्यता मिळाल्यानंतर आता निविदा प्रकिया सुरू करण्यात आली आहे. श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र मंदिराचे क्षेत्रफळ 1240 चौरस मीटर आहे. येथे यात्रा उत्सवाच्या वेळी दरदिवशी सुमारे दीड ते दोन लाख, तर वर्षात सुमारे 40 ते 50 लाख भाविक भेट देतात. या गडाचा विकास तीन टप्प्यांत करण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात वास्तूचे जतन आणि संवर्धन, पायाभूत सुविधा आणि पर्यटक सोयी-सुविधा, जलव्यवस्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये शास्त्रीय पद्धतीने दगडांची स्वच्छता, अनियोजित व हानिकारक जोडण्या काढणे, खराब झालेल्या चुन्याच्या गिलाव्याची डागडुजी, पाणीगळती थांबविण्यासाठी डागडुजी, विद्युत सोयी, पाणीपुरवठा, निचरा व्यवस्था, मल:निसारण आणि त्या पाण्याचा पुनर्वापर, योग्य वायुविजन प्रणाली, मंदिर परिसरातील धूळ गोळा करण्यासाठी यंत्र, घनकचरा व्यवस्थापन, भक्तांसाठी सोयी-सुविधा, गर्दीचे व्यवस्थापन, आपत्कालीन व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक योजना आदी कामे करण्यात येणार आहेत.
सन 2021-22 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात श्री क्षेत्र जेजुरी गडाच्या विकासाकरिता निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडून 349.45 कोटी रुपये रकमेचा श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखडा एकूण तीन टप्प्यांमध्ये राबविण्याचे नियोजन तयार केले गेले आहे.
सांस्कृतिक वारसास्थळाच्या जतन, संवर्धन व व्यवस्थापनासाठीचे नियोजन करताना राष्ट्रीय तसेच जागतिक स्तरावर नियमावली आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे ठरणार आहे. जेजुरीची ओळख फक्त धार्मिक नसून, महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक केंद्र म्हणून वृद्धिंगत होणार आहे.
– डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे
राज्य सरकारने जेजुरीच्या विकास आराखड्याला मान्यता दिल्यानंतर टेंडर काढण्यात आले आहे. जेजुरीचा टप्प्या-टप्प्याने विकास करण्यात येणार आहे. त्या प्रकियेला सुरुवात करण्यात आली आहे. हा विकास आराखडा राबविल्यानंतर या शहराची एक वेगळी ओळख तयार होणार आहे.
– किरण इंदलकर, जिल्हा नियोजन अधिकारी