निरा-देवघर कालव्यासाठी 500 कोटींची निविदा; खासदार नाईक-निंबाळकर यांची माहिती

निरा-देवघर कालव्यासाठी 500 कोटींची निविदा; खासदार नाईक-निंबाळकर यांची माहिती
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : निरा-देवघर धरणातील अनेक वर्षांपासून रखडलेली कालव्यांची कामे लवकरच मार्गी लागणार आहेत. त्यानुसार 500 कोटींच्या निविदा पुढील काही दिवसांत काढण्यात येणार आहेत. यामुळे सध्या धरणापासून 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या उघड्या कालव्यापासून पुढे 65 ते 87 किलोमीटरच्या बंदिस्त कालव्याच्या कामास गती येणार आहे.

यामुळे माढा मतदारसंघातील बहुतांश दुष्काळी तालुक्यांना पुढील दोन ते तीन वर्षांत सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. सांगोल्यापर्यंत या धरणातून पाणी पोहचविण्यासाठी 3 हजार 900 कोटींचा खर्च येणार आहे. त्यासाठीची निविदा लवकरच काढण्यात येणार असून, याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार आहे, अशी माहिती माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिह नाईक-निंबाळकर यांच्या उपस्थितीत माढा मतदारसंघातील विविध सिंचन प्रकल्पांच्या सद्य:स्थितीच्या सर्वपक्षीय आढावा बैठकीचे आयोजन शुक्रवारी पुण्यातील सिंचन भवन येथे केले होते. या बैठकीस आमदार संजयमामा शिंदे, आमदार दीपक चव्हाण, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार जयकुमार गोरे यांच्यासह जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हनुमंत धुमाळ, हनुमंत गुणाले आदी अधिकारी उपस्थित होते.

खा. नाईक-निंबाळकर म्हणाले की, माढा लोकसभा मतदारसंघातील अनेक तालुके दुष्काळी आहेत. या भागांना अनेक वर्षांपासून त्यांच्या हक्काचे पाणी न मिळाल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून निरा-देवघर धरणासह आसपासच्या धरणातील पाणी बारामती आणि इंदापूर या तालुक्यांनाच जात आहे. ही बाब लक्षात घेऊन पाण्याचे पुन्हा नियोजन करण्यात येत आहे.

मुळातच निरा देवघर हे धरण सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांतील शेतीसिंचनासाठी बांधण्यात आले आहे. या धरणाची साठवणक्षमता 12.98 टीएमसी आहे. या धरणामधून पाणी उचलण्यासाठी एकूण 3 हजार 900 कोटींची योजना आहे. सद्य:स्थितीत 500 कोटींची निविदा काढण्यात आली आहे. त्यामुळे 65 ते 87 किलोमीटरपर्यंत बंदिस्त पाइपलाइनमधून पाणी पुढे जाण्याची सोय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हे पाणी फलटण तालुक्यातील सुरवडी ब्रँच कॅनॉलपर्यंत पोहचणार आहे. त्यामुळे येत्या पधरा दिवसांत टेंडर काढून कामे मार्गी लावण्यात येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news