बावडा : पुढारी वृत्तसेवा : फळबागांमध्ये उन्हाळी भुईमुगाचे आंतरपीक घेण्याकडे इंदापूर तालुक्यातील शेतकर्यांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. अनेक शेतकर्यांचे भुईमुगाचे पीक जोमदार वाढले आहे. पाण्याच्या उपलब्धतेनुसार अनेक शेतकर्यांनी फळबागेत 10 ते 15 गुंठे क्षेत्रावर वर्षभर घरी लागणार्या शेंगदाण्याची सोय व्हावी, या हेतूने उन्हाळी भुईमुगाचे पीक घेतले आहे. आंतरपीक घेतल्याने मुख्य पिकास दिलेली खते, पाणी आपोआप या भुईमुगास मिळत आहेत. त्यामुळे त्याची चांगली वाढ होत आहे. इंदापूर तालुक्यात गेल्या वर्षी झालेल्या अपुर्या पावसाने पाण्याची कमतरता भासत असतानाही अनेक शेतकर्यांनी उपलब्ध क्षेत्रावर भुईमुगाचे पीक धाडसाने माड पद्धतीने अथवा आंतरपीक म्हणून घेतलेले आहे. भुईमुगाचे पीक पेरू, सीताफळ, मोसंबी, डाळिंब आदी फळबागांमध्ये घेतल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यात तीन-चार दशकांपूर्वी भुईमुगाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर होते, मात्र उसाचे क्षेत्र वाढल्याने व काढणीसाठी मजुरांच्या टंचाईमुळे भुईमुगाच्या क्षेत्रात घट झाल्याचे कृषी पदवीधर शेतकरी किशोर घोगरे-पाटील (बावडा), राजीव भाळे, राहुल कांबळे (खोरोची), रणजीत खाडे (भोडणी) यांनी सांगितले. भुईमूग पिकाच्या काढणीनंतर वेल हे पूर्वी बांधावर टाकून देण्यात येत असत, आता मात्र गेल्या एक-दोन दशकांपासून भुईमुगाच्या वेलांचा वापर हा जनावरांना चारा म्हणून केला जात आहे, अशी माहिती दूध व्यावसायिक शरद जगदाळे पाटील (टणू) व दूधगंगा दूध संघाचे संचालक दयानंद गायकवाड (बोराटवाडी) यांनी दिली. सध्या खाद्यतेलाच्या किमतीमध्ये वाढ होत असल्याने उत्पादित भुईमुगास चांगला बाजारभाव मिळेल, असेही शेतकर्यांनी सांगितले.
हेही वाचा