

कोरेगाव भीमा : पुढारी वृत्तसेवा : धावत्या टेम्पोला अचानक आग लागली. सुदैवाने यामध्ये कोणतीही हानी झाली नाही. मात्र, संपूर्ण टेम्पो जळून खाक झाला. कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे पुणे-नगर महामार्गावर शुक्रवारी (दि. 7) पहाटे ही घटना घडली. या घटनेची नोंद शिक्रापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. भारत सोपान जाधव (वय 52, रा. अण्णा भाऊ साठेनगर, वाकड, ता. मुळशी) हे त्यांच्या ताब्यातील एमएच 14 जेएल 6384 टेम्पोमधून गव्हाची वाहतूक करत होते. पुणे-नगर महामार्गाने ते पुण्याच्या दिशेने येत होते.
पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अचानक टेम्पोच्या पुढील भागातून धूर येऊ लागला. त्यामुळे जाधव यांनी तातडीने टेम्पो महामार्गाच्या बाजूला उभा केला. तोपर्यंत टेम्पोच्या पुढील भागाला आग लागली होती.
रस्त्याने जाणार्या इतर वाहनचालकांनी थांबून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिस हवालदार शिवाजी चितारे, उद्धव भालेराव यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने आग नियंत्रणात आणली. मात्र, तोपर्यंत टेम्पो जळून खाक झाला. सुदैवाने यामध्ये कोणती जीवितहानी झाली नाही. याप्रकरणी पोलिस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक महेंद्र पाटील हे पुढील तपास करत आहेत.