

पुणे: पुणे- भुवनेश्वर विमानाला पक्षी धडकल्याची घटना बुधवारी (दि.06) घडली. या विमानाच्या तपासणीसाठी आता एअरलाइन्सचे तांत्रिक विश्लेषण पथक पुणे विमानतळावर दाखल झाले असून, त्या विमानाचे गुरुवारी (दि.07) दिवसभर तांत्रिक विश्लेषण सुरू होते. या विमानाला कोणती तांत्रिक अडचण आली आहे का, आली असेल तर त्यावर काय उपाययोजना कराव्या लागतील, याची पहाणी या तांत्रिक विश्लेषण पथकाकडून गुरुवारी रात्री उशिरापर्यंत करण्यात आली. शुक्रवारीही या पक्षी धडकलेल्या विमानाची तपासणी होणार आहे.
विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पुणे विमानतळावरून बुधवारी दुपारी 4 च्या सुमारास पुणे-भुवनेश्वर विमानाचे नियोजित उड्डाण होते. त्यानुसार सुमारे 140 प्रवाशांना घेऊन पुणे ते भुवनेश्वर (एआय 1098) हे विमान निघाले. (Latest Pune News)
टेक ऑफ घेण्यापूर्वीच या विमानाला पक्षी धडकला. त्यामुळे वैमानिकाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विमानाला पार्किंग बेवर घेतले आणि घडलेल्या घटनेची माहिती वरिष्ठ अधिका-यांना दिली. या घटनेची माहिती मिळताच, पुणे विमानतळ अधिका-यांनी प्रवाशांना दुसरे विमान उपलब्ध करून दिले. आणि पक्षी धडकलेल्या विमानाची गुरुवारी दिवसभर तांत्रिक तपासणी सुरू असल्याचे विमानतळ अधिका-यांनी दै.‘पुढारी’शी बोलताना सांगितले.
वैमानिकाच्या सतर्कतेमुळे वाचले 140 प्रवाशांचे प्राण...
पुणे विमानतळावरून भुवनेश्वरला जाण्याच्या तयारीत असलेल्या एअर इंडियाच्या विमानाला बुधवारी (दि.06) दुपारच्या सुमारास पक्षी धडकला. यामुळे विमानाला विमानचालकाने तत्काळ पार्किंग बेवर घेतले, वैमानिकाच्या तत्काळ याबाबत लक्षात आल्यामुळे सुदैवाने होणारी मोठी दुर्घटना टळली. याची माहिती मिळताच विमानतळ प्रशासनाने तत्काळ प्रवाशांना दुसरे विमान उपलब्ध करून दिले.
पक्षी हटवण्यासाठी काय उपाययोजना?
विमानतळ संचालक ढोके म्हणाले, पुणे विमानतळ आणि भारतीय हवाई दलाकडून येथील परिसरातून पक्षी हटवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. महापालिकेसोबत चर्चा झाली असून परिसरातील कचरा असलेल्या ठिकाणांवरही आवश्यक त्या उपाययोजना महापालिका प्रशासनाकडून केल्या जात आहेत.
दिल्ली- पुणे विमान प्रवाशांना पाच तास उशीर...
दिल्लीहून पुण्याला घेऊन येणार्या विमानाला मंगळवारी पाच तास उशीर झाला. या विमानाच्या शौचालयात तांत्रिक समस्या आल्याचे विमान कर्मचार्यांच्या लक्षात आले. त्यामुळे दिल्ली विमानतळावरून पुण्याला हे विमान उड्डाण करू शकले नाही.चार ते पाच तासांनंतर प्रवाशांसाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली.
पुणे विमानतळावरून एअर इंडियाचे पुणे- भुवनेश्वर विमान टेक ऑफ करताना विमानाला पक्षी धडकण्याची घटना घडली आहे. याची माहिती मिळताच तत्काळ विमान धावपट्टीवरून पार्किंग बे वर घेण्यात आले. आणि प्रवाशांना दुसर्या विमानाने पुढील प्रवासासाठी पाठवण्यात आले आहे. सदरील अपघातग्रस्त विमानाची तपासणी सुरू आहे.
- संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ
लोहगाव विमानतळावर पुन्हा एकदा प्रवासी विमानास पक्षी धडकल्याची घटना घडली. ही घटना आणखी एक अतिशय गंभीर घटना आहे. पुणे विमानतळाची धावपट्टी - भारतीय हवाई दलाच्या तसेच नागरी विमानतळ टर्मिनल - एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया च्या अखत्यारित असल्यामुळे या घटनांच्या पार्श्वभूमीवर मी 2 जुलै 2025 रोजी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह व केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांना ई-मेलद्वारे लोहगाव विमानतळावर वारंवार घडत असलेल्या व हवाई प्रवासी, नागरी तसेच लढाऊ विमानांसाठी धोकादायक असलेल्या या घटनांविषयी चिंता व्यक्त केली होती. या घटनांची तातडीने दखल घेऊन संबंधित यंत्रणांमार्फत प्रभावी उपाययोजना करण्याची विनंती मी त्यांना केली होती. यासंबंधी काही संभाव्य उपायोजना देखील मी माझ्या ई-मेलमध्ये सुचवल्या होत्या. तरी संभाव्य धोक्याने होऊ शकणारे मोठे नुकसान पाहता यावर आता तातडीने युद्धपातळीवर उपाययोजना होणे अपेक्षित आहे.
- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ
कचरा उचलण्यासाठी तीन शिफ्टमध्ये स्वच्छता कर्मचार्यांची नेमणूक केली आहे. यात तीन आरोग्य निरीक्षकांचा देखील समावेश आहे. विमानतळ परिसरात कोठेही कचरा दिसू नये, याकरिता आमची यंत्रणा दररोज तीन शिफ्टमध्ये काम करत आहे. खासगी व्यावसायिक दुकानदार यांना परिसरात कचरा टाकू नये, यासंदर्भात नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
- संदीप कदम, प्रमुख, घनकचरा व स्वच्छता विभाग, मनपा