कामशेत : शिक्षक संपावर गेले; विद्यार्थ्यांचे नुकसान ? त्वरित तोडगा काढण्याची मागणी

कामशेत : शिक्षक संपावर गेले; विद्यार्थ्यांचे नुकसान ? त्वरित तोडगा काढण्याची मागणी

कामशेत; पुढारी वृत्तसेवा : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेने संप पुकारला आहे. त्या संपामध्ये जिल्हा परिषद शाळेचे शिक्षकही सहभागी झाले आहेत. ऐन परीक्षेच्या काळात शिक्षक बेमुदत संपावर गेल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. राज्य सरकारने लवकरच या प्रश्नी तोडगा काढावा, अशी मागणी पालकांनी केली आहे.

पंधरा दिवसांवर वार्षिक परीक्षा सुरू होणार असून, अशावेळी शिक्षक संपावर गेल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर निश्चितच परिणाम होईल. हा संप बेमुदत असल्यामुळे शाळा कधी सुरू होईल हा प्रश्न पालकांना सतावतो आहे. त्यांच्या परीक्षेवर होणार्‍या परिणामास जबाबदार कोण, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.

मावळ तालुक्यात शाळा – 272

फक्त शाळा सुरू – 70

केंद्रप्रमुख/शिक्षक – 852

शिक्षक व केंद्रप्रमुख संपावर- 701

39 – शिक्षक रजेवर
112 – शिक्षक शाळेत उपस्थित

तालुक्यातील सदर परिस्थिती जिल्हा कार्यालयाला कळवले आहे. दोन दिवसांत संप मिटेल, अशी आशा आहे. राज्य शासन याबाबत निर्णय घेईल. सध्या अशा शिक्षकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करता येत नाही. कारण तसे त्यांनी शिक्षण विभागाला कळवले आहे. सध्या दहावी, बारावीची बोर्ड परीक्षा सुरू असताना पर्यायी व्यवस्था निर्माण करणे, पण शक्य नाही. शिवाय शिक्षकांची संख्या कमी असल्याने याला कोणताही पर्याय देता येऊ शकत नाही.
                                             – सुदाम वाळुंज,
                     प्रभारी गटशिक्षण अधिकारी, शिक्षण विभाग

विद्यार्थी हेच आमचे दैवत आहे. आम्ही मुलांचे नुकसान होऊन देणार नाही. बर्‍यापैकी अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे. संप काळात राहिलेला अभ्यास सुटीच्या दिवशीसुद्धा आम्ही तास घेऊन विद्यार्थ्यांचा अभ्यास भरून काढू. शासनाकडून आमच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी हीच योग्य ती वेळ आहे. तरी शासनाने विनाविलंब त्वरित योग्य तो निर्णय घ्यावा, अशी आमची मागणी आहे.

                                              – सुरेश पाटील
                                  अध्यक्ष, मावळ तालुका शिक्षक

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news