

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील शाळांमध्ये तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अध्यापन करण्यासाठी शिक्षकांनी तयार केलेले ई-साहित्य परिणामकारक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन ई-साहित्यनिर्मितीची चळवळ उभी राहण्यासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांसाठी ई-साहित्यनिर्मिती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
सर्वोत्कृष्ट ई-साहित्यनिर्मितीसाठी तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरासाठी प्रत्येकी 84 पुरस्कार दिले जाणार आहेत. शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जाहीर केला आहे. कोरोनाकाळात शाळा बंद असताना शिक्षकांनी ऑनलाइन पद्धतीने अध्यापन केले होते. त्यानंतर शिक्षक तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापन अधिक रंजक आणि दर्जेदार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. राज्यातील तंत्रस्नेही शिक्षकांची चळवळ अधिक सक्रिय होऊन 2 लाख 89 हजार 560 शिक्षक तंत्रस्नेही झाल्याचे राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेमार्फत आढळून आले आहे.
या शिक्षकांनी केवळ आपले वर्ग ऑनलाइन पद्धतीने न घेता विद्यार्थ्यांनाही तंत्रस्नेही केले आहे. त्यामुळे आता ई-साहित्यनिर्मिती करण्यासाठी शिक्षकांची स्पर्धा घेतली जाणार आहे. त्यात पहिली ते बारावी, अध्यापक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी भाषा, गणित, इंग्रजी, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्रे या विषयावर शिक्षकांना अॅनिमेशन, ऑग्मेंटेड रिलिटी, व्हर्च्युअल रिलिटी प्रकारातील चित्रफीत, खेळावर आधारित चित्रफीत, ई-चाचणीवर आधारित चित्रफीत, दिव्यांगत्व प्रकारानुसार शिक्षणासाठी चित्रफीत तयार करता येईल.
ई-साहित्यातील चित्रफिती तयार करण्याबाबत सूचनाही देण्यात आल्या आहेत. चित्रफीत केवळ अध्ययन-अध्यापन प्रणालीशी निगडित असणे आवश्यक आहे. कमीत कमी पाच ते जास्तीत जास्त नऊ मिनिटांची चित्रफीत असणे आवश्यक आहे. स्पष्टता, गरज, परिणाम, नावीन्यता, समन्वय, उपयोगिता, चित्रफीत दर्जा अशा निकषांवर ई-साहित्याचे मूल्यमापन करण्यात येईल.
स्पर्धेसाठी एकूण 11 कोटींचा खर्च…
स्पर्धेतील तालुका, जिल्हा, राज्यस्तरावरील पारितोषिके आणि अन्य खर्चांसाठी 11 कोटी 23 लाख 32 हजार रुपयांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, स्पर्धेची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडे सोपविण्यात आली आहे.