उत्तरपत्रिका तपासणीवर शिक्षकांचा बहिष्कार : मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन

उत्तरपत्रिका तपासणीवर शिक्षकांचा बहिष्कार : मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे 10, 20, 30 वर्षांची आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना त्वरित लागू करावी, सर्व वाढीव पदांना मंजुरी द्यावी व आयटी विषय शिक्षकांना वेतनश्रेणी द्यावी आदी प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघामार्फत उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार आंदोलन करण्यात आले. बारावीच्या परीक्षेला बुधवार (दि. 21) पासून सुरुवात झाली असताना राज्यातील शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घातला आहे.

परीक्षेच्या पहिल्या दिवसापासूनच उत्तरपत्रिका तपासणीच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाते. मुख्य नियामक यांची बैठक घेऊन उत्तरपत्रिका तपासणीबाबत संबंधितांना सूचना दिल्या जातात. मात्र, या बैठकीवरच बहिष्कार घालण्यात आला. तसेच, याबाबतचे निवेदन पुणे विभागीय शिक्षण मंडळाच्या अधिकार्‍यांना दिल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाचे सरचिटणीस संतोष फाजगे यांनी दिली. प्रलंबित मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवले जाणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासण्याचे काम थांबले आहे. या वेळी मुकुंद आंधळकर, लक्ष्मण रोडे, विक्रम काळे, संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. राहुल गोलांदे, हिम्मत तोबरे, स्मिता वर्पे, लक्ष्मण दहिफळे उपस्थित होते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news