ड्रग्जचा कोडवर्ड : ‘न्यू पुणे जॉब’ म्हणजेच मेफेड्रॉन! | पुढारी

ड्रग्जचा कोडवर्ड : ‘न्यू पुणे जॉब’ म्हणजेच मेफेड्रॉन!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गंज लागू नये म्हणून पेंटमध्ये वापरले जाणारे केमिकल व मलेरियाच्या औषधामध्ये वापरण्यात येणार्‍या एका उत्पादनाव्यतिरिक्त भीमाजी ऊर्फ अनिल साबळे याच्या कुरकुंभमधील कारखान्यात ‘न्यू पुणे जॉब’ उत्पादन तयार करण्यात येत होते. न्यू पुणे जॉब हे दुसरे-तिसरे काही नसून कारखान्यात तयार करण्यात येणारे मेफेड्रॉन असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. कोडवर्डप्रमाणे या ड्रग्जच्या उत्पादनाला पुणे न्यू जॉब म्हणून संबोधले जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

40 कामगारांसह इतरांना म्हणून भीमाजी ऊर्फ अनिल साबळे याने मेफेड्रॉनच्या उत्पादनाला न्यू पुणे जॉब असे नाव दिले होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 19 फेब्रुवारीला कारवाई करत पुण्यात साडेतीन किलो मेफेड्रोन जप्त केले होते. यानंतर कुरकुंभमधील भीमाजी साबळेच्या कारखान्यातून 1400 कोटींचे तब्बल 718 किलो ड्रग्ज जप्त केले होते. यानंतर भीमाजी साबळे आणि त्याला मेफेड्रोन बनविण्याचा फॉर्म्युला देणार्‍या युवराज भुजबळला पुणे पोलिसांनी अटक केली. दोघांच्या तपासात अनेक गोष्टी समोर आल्या असून, कारखान्यातील कामगारांना ते काय बनवत आहेत, याची माहिती कळू नये, म्हणून साबळेने मेफेड्रोनला ‘न्यू पुणे जॉब’ नाव दिले होते. पहिले उत्पादन हे गंज लागू नये, म्हणून पेंटमध्ये वापरले जाणारे केमिकल तयार करण्यात येत होते.

तर दुसरे मलेरियाच्या औषधासाठी लागणारे कम्पोनंटचे उत्पादन येथे घेतले जात होते. तर तिसरे उत्पादन ‘न्यू पुणे जॉब’ नावाने तयार केले जात होते. साबळे याने 2006 साली अर्थ केम नावाने कुरकुंभ एमआयडीसीमध्ये कारखाना सुरू केला होता. या कारखान्यात काही तरी चुकीचे होत आहे, याचा संशय येऊ नये, म्हणून साबळेने वेगळे असे काही करण्याचा प्रयत्न केला नाही. रोज घडीला जसे कंपनीतून एखादे उत्पादन निघते, तसेच उत्पादन या कारखान्यातून सुरू होते. त्यामुळे साबळेच्या कारखान्यावर कोणाची नजर गेली नाही. ऑक्टोबर 2023 पासून साबळेच्या कारखान्यात मेफेड्रोन बनविण्यात येत होते. आठवड्याला 300 किलोपर्यंत मेफेड्रोन बनवण्याची क्षमता साबळेच्या कारखान्याची होती. तसेच, साबळेच्या कारखान्यात तयार होणारे सगळे मेफेड्रोन हे टेम्पोच्या माध्यमातून रस्त्याने पोहोचविले जात होते. दिल्लीला बॅरेल टेम्पोमध्ये भरून पाठवण्यात आले होते.

साबळेच्या कारखान्याच्या परवान्यांचीही चौकशी

साबळेच्या कारखान्याला कोणत्या- कोणत्या विभागाने परवाने दिले आहेत, याची चौकशी पुणे पोलिस करत आहेत. तसेच, साबळेची बँक खाती गोठविण्यात आली असून, त्यासंदर्भात अधिक माहिती पुणे पोलिस घेत आहेत.

हेही वाचा

Back to top button