

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मुलांनी उर्दू माध्यमातून प्राथमिक धडे घेतले, तर त्यांच्यात उर्दू या मातृभाषेबद्दल आवड निर्माण होईल. उर्दू माध्यमांच्या शाळांसाठी प्रयोगशाळांचा मोठा कार्यक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. लवकरच शिक्षकांच्या भरतीचा कार्यक्रम राबवीत आहोत. त्यात उर्दू शाळांतील शिक्षकांचीसुध्दा भरती केली जाईल. उर्दू भाषेचे जतन व्हावे, यादृष्टीनेसुद्धा प्रयत्न केले जातील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी (दि. 9) दिली.
शानदार स्पोर्ट्स अॅण्ड एज्युकेशन असोसिएशनच्या वतीने (जयसिंगपूर, कोल्हापूर) जागतिक उर्दू दिनानिमित्त आयोजिलेल्या विशेष कार्यक्रमात केसरकर यांनी ऑनलाइन संवाद साधला. या कार्यक्रमात एम. जी. पटेल नॅशनल अॅवॉर्ड फॉर बेस्ट टीचर 2022 या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. विविध शिक्षकांना या पुरस्काराने गौरविले. माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, असोसिएशनचे एम. जी. पटेल, डॉ. ख्वाजा मोहम्मद इकरामउद्दीन, असोसिएशनचे अध्यक्ष अख्तर पटेल, संस्थापक डॉ. मोहम्मद आतिक पटेल आदी उपस्थित होते.