ताथवडे परिसर अडकला समस्यांच्या विळख्यात

ताथवडे परिसर अडकला समस्यांच्या विळख्यात

ताथवडे : परिसर समस्यांच्या विळख्यात अडकला असून, वाहतूक कोंडी, अस्वच्छ गटार आणि गाडा रस्त्याचे संथ गतीने सुरू असलेले काम यामुळे स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

लोकसंख्या वाढली, पण विकासाकडे दुर्लक्ष
ताथवडे गावाचा विकास मोठ्या झपाट्याने होत आहे. आयटीनगरी हिंजवडीजवळील हाकेच्या अंतरावरील हे गाव आहे. पुणे-मुंबई महामार्गालगत असणार्‍या गावांपैकी एक गाव आहे. अनेक नामांकित कंपन्या, उच्चभ्रू सोसायट्या, नामांकित कॉलेज, शाळा, वाहनाचे शोरुम यामुळे ताथवडे गावाचा चेहरामोहरा बदलला आहे. अनेक आयटिजन्स आपल्या स्वप्नातील घर या परिसरात घेत आहेत. त्यामुळे आपसूकच येथील लोकसंख्याही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. परंतु, नागरिकांना सुविधा मिळत नसल्यामुळे नाराजी पसरली आहे.

पायाभूत सुविधांची वानवा
परिसराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. परंतु, अपेक्षित पायाभूत सुविधांची वानवा येथे दिसून येत आहे. ताथवडेतील रहिवाशी वाहतूक कोंडी, अस्वच्छ उघडी गटारे, सखल भागात सतत साचणारे पाणी आणि सार्वजनिक शौचालयाचा अभाव याने ग्रासले असताना मुख्य दळणवळणाचा आणि वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार्‍या ताथवडेतील गाडा रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

खडीमुळे रस्ता बनला निसरडा
गाडा रस्त्याच्या दुतर्फा अनेक उच्चभ्रू सोसायट्या तसेच नामांकित खासगी शाळा आहेत. तसेच, हाच रस्ता पुणे-मुंबई महामार्गाला जोडला असल्याने या रस्त्यावर नेहमीच रहदारी असते. रस्त्यावरील माती, खडी, राडारोडा यामुळे येथील नागरिक पुरते हैराण झाले असून, परिसरातील धुळीमुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना श्वसनाच्या गंभीर समस्या उद्भवत आहेत. रस्त्यावरील खडी व मातीमुळे रस्ता निसरडा बनला असून, अनेकांच्या दुचाकी घसरून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.

जवळपास एक वर्षापासून सदर रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे पालकांना विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. विशेषतः शाळा सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळेस या रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते आणि रस्त्यावरील खडीमुळे गाडीवरून घसरून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
                                                                  – प्रकाश गायकवाड, पालक

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news