

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना नेते माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा सापडला असून बँकॉकला जाताना त्याला पुणे पोलिसांनी परत आणल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत पोलिस आयुक्त आणि तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत याचे आज (१० फेब्रुवारी) दुपारी पुणे विमानतळावरून अपहरण झाल्याची माहिती माहिती समोर आली होती. पुणे पोलिसांना ही माहिती समजताच पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवली, यानंतर अखेर ऋषीराज सावंत पुणे विमानतळावर दाखल झाल्याची माहिती पुण्याचे पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ऋषीराज सावंत यांनी पुणे विमानतळावरून जाताना एक खासगी विमान बूक केलं होतं. ते या विमानातून बँकॉकडे निघाले होते. माजी मंत्री तानाजी सावंत यांनी याबाबत तक्रार दिल्यानंतर खासगी विमान ट्रॅक करण्यात आले. यानंतर आता ऋषीराज सावंत पुण्यात सुखरुप आले आहेत. त्यांच्यासोबत एकूण तीनजण होते, ते सुखरुप आहेत. तसेच ते कोणत्या कारणासाठी बँकॉककडे चालले होते? त्यांनी त्यांच्या घरी का सांगितलं नव्हतं? याची माहिती चौकशीनंतर स्पष्ट होईल”, अशी माहिती पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.