देशात सर्वाधिक पाऊस मेघालय राज्यातील चेरापुंजी अन् मोसमीराम या गावात पडतो, अशी नोंद सर्वत्र आहे. दरवर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत या भागात सरासरी 9 हजार मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र पुणे अन् रायगड जिल्ह्यांना जोडणारा ताम्हिणी हा घाटदेखील देशाला सर्वाधिक पाऊस देतो. यावर पुण्यातील चार ज्येष्ठ हवामान तज्ज्ञांनी संशोधन करून ‘रॉयल मेट्रोलॉजिकल सोसायटी’ या जगातील प्रतिष्ठित शोधपत्रिकेत अवघ्या जगाला नवी माहिती दिली आहे. या घाटातील तब्बल 38 वर्षांच्या पर्जन्याची आकडेवारीच बोलकी आहे. मात्र, तरीही ताम्हिणी घाटाच्या विक्रमी पावसाची नोंद देशाने घेतली नाही.
देशात सर्वाधिक पाऊस कुठे पडतो? हा प्रश्न सामान्यज्ञान स्पर्धेत हमखास विचारला जातो. आयएएस किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेतही हा प्रश्न परीक्षार्थी पाठ करून जातात. त्याचे छापील उत्तर एकच येते मेघालय राज्यातील चेरापुंजी हे गाव. मात्र, अलिकडच्या काळात त्याच राज्यातील मोसमीराम या गावाने चेरापुंजीलाही मागे टाकत पहिला क्रमांक मिळवल्याची नवी नोंद आहे. मात्र, यंदाच्या 2024 च्या मान्सूनने ताम्हिणी घाटाचे नाव चर्चेत आले. कारण तेथे यंदा जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत सुमारे 10 हजार मी.मी. च्या जवळपास पाऊस पडला. ताम्हिणी येथे दरवर्षीची सरासरी कमीत कमी 5 ते 6 हजार मी.मी. इतकी आहे, मात्र प्रत्यक्षात तेथे 9 हजार ते 9 हजार 500 मी.मी. पाऊस पडतो. यंदा 2024 मध्ये जून ते सप्टेंबर या काळात येथे तब्बल 9 हजार 800 मी.मी. म्हणजे सुमारे दहा हजार मी.मी.च्या जवळपास पाऊस झाला आहे.
याबाबत पुण्यातील ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी खूप नवी माहिती दिली. ताम्हिणी घाट आणि चेरापुंजीच्या तब्बल 38 वर्षांच्या आकडेवारीचा अभ्यास केला अन् त्यांनी देशासह जगाला ताम्हिणी घाटच सर्वाधिक पर्जन्याचा प्रदेश असल्याचे शोधनिबंधातून पटवून दिले. मात्र, तरीही ताम्हिणी घाटाची नोंद घेतली जात नाही, अशी खंत शोधनिबंधातच व्यक्त केली आहे.
ताम्हिणीचा मान्सूनचा पाऊस हा वार्याच्या दिशेने असलेल्या स्थानकांपेक्षा जास्त आहे.
सर्वमान्यपणे स्वीकारल्या जाणार्या मताच्या विरुद्ध हे संशोधन आहे. कारण पर्वतांच्या बाजूने पाऊस कमी पडतो, हे खोडून काढले आहे.
अल निनो असो किंवा ला-निना असो दुष्काळातही तेथे एका दिवसात तब्बल 695 मी.मी. पाऊस पडल्याची नोंद आहे. तीन दिवसांचा सरासरी पाऊस 1055 मी.मी. गणला गेलाय.
ताम्हिणीजवळील मुळशी कॅम्प, शिरगाव, दावडी आणि आंबवणे या घाटमाथ्यावरील गावांसह महाबळेश्वर येथील मोसमी पावसाचे प्रमाण जास्त आहे.
ताम्हिणी हे स्टेशन मुळा नदीपात्रातील हवामान शास्त्रीय उपविभाग आहे.
या शास्त्रज्ञांनी अभ्यासासाठी घाटमाथ्यावरील मुळशी- कॅम्प, शिरगाव, दावडी, आंबवणे आणि ताम्हिणी क्षेत्राची निवड केली.
महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस महाबळेश्वर येथे पडतो असे मानले जाते. पण, ताम्हिणीचा पाऊस त्याच्या दीड ते पावणेदोन पटीने जास्त आहे.
पुण्यातील या चारही शास्त्रज्ञांनी देशातील इतर दिग्गज हवामान शास्त्रांचे दावे खोडत ताम्हिणीचे महत्त्व पटवून दिले.
एका दिवसात ताम्हिणी घाटावर तब्बल 400 ते 800 मी.मी. पाऊस मान्सून मोसमात पडतो.
पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेतील (आयआयटीएम, पाषाण) डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी, डॉ. डी. आर. कोठावळे, एन. आर. देशपांडे, एस. जी. नरखेडकर या चार ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञांनी अथक परिश्रम घेत ताम्हिणी घाटाचा नवा परिचय देशासह अवघ्या जगाला करून दिला आहे. त्यांनी 1975 ते 2013 या तब्बल 38 वर्षांचा डेटाच जगासमोर अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने संशोधन करून 2016 साली मांडला आहे. सरासरी मोसमी पाऊस येथे चेरापुंजीपेक्षाही जास्त पडतो. मात्र, भारतातील कोणत्याही हवामान संस्थेने त्याची दखल घेतली नसल्याची खंत या चारही ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी एकूण 20 पानी शोधनिबंधाच्या सुरुवातीलाच व्यक्त केली आहे. त्यांनी शोधनिबंधाचे शीर्षक ‘एक अज्ञात अतिवृष्टीचे ठिकाण, ताम्हिणी घाट’ असे देत देशासह अवघ्या जगाचे लक्ष वेधले.
1975 ते 2013 या कालावधीतील ताम्हिणी (जून ते सप्टेंबर) मधील आकडेवारीत मोठी तफावत दिसून आली. ताम्हिणी अन् चेरापुंजीच्या पर्जन्यमानाच्या आकडेवारीच्या विश्लेषणातून ताम्हिणी घाट देशात नंबर वन आहे, हेच अनेक वेळा दिसून आले. या शोधनिबंधात अनेक शास्त्रीय आलेखांद्वारे हे पटवून दिले आहे. हा शोधनिबंध 2016 मध्ये प्रसिद्ध झाला तरीही अजून ताम्हिणी घाट दुर्लक्षितच आहे.
आम्ही प्रत्यक्ष ताम्हिणी घाटमाथ्यावर सलग आठ वर्षे जाऊन अभ्यास केला अन् मगच हा दावा केला आहे. 1975 ते 2013 या 38 वर्षांतील ताम्हिणीचे मान्सून काळातील पावसाचे आकडे तपासले तेव्हा अनेक वेळा ताम्हिणीने चेरापुंजीला मागे टाकल्याची आकडेवारी मिळाली. मात्र अजून कोणीही याची दखल घ्यायला तयार नाही. यंदा तर सुमारे दहा हजार मी.मी.च्या जवळपास ताम्हिणी घाटात पाऊस झाला. तो यंदाचा देशातील सर्वाधिक पाऊस आहे. त्यापाठोपाठ चेरापुंजी अन् मोसमीरामचा नंबर आहे. तेथेही 8 ते 9 हजार मी.मी. पाऊस पडतो पण ताम्हिणीची आकडेवारी चेरापुंजीपेक्षा काकणभर सरस ठरली आहे.
डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी, निवृत्त हवामान शास्त्रज्ञ, आयआयटीएम, पुणे