

भोर; पुढारी वृत्तसेवा : तमाशा हा गण, गौळण, लावणी, बतावणी आणि वग, अशा पाच अंगांनी समृद्ध झालेला आहे. ही कला जिवंत ठेवताना आलेल्या अडचणी मनात ठेवत अव्याहतपणे वडगाव डाळच्या रसिकांचे गेली 25 वर्षे मनोरंजन केले. याबद्दल यात्रा कमिटीच्या वतीने तमाशा कलावंतांचा सन्मान करण्यात आला.
वडगाव डाळ (ता. भोर) येथे श्री काळभैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त श्रींचा अभिषेक. सायंकाळी श्री काळभैरवनाथ देवाची पालखी मिरवणूक, रात्री ढोल-लेझीम पथकाचे कार्यक्रम पार पडले. काळभैरवनाथ यात्रेमध्ये गेली 25 वर्षे लोककला सादर करणार्या चंद्रकांत विरळीकर लोकनाट्य तमाशा मंडळाचे मालक चंद्रकांत विरळीकर आणि त्यांच्या पत्नी शोभा विरळीकरांचा यात्रा कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सरपंच नवनाथ चौधरी, विठ्ठल चौधरी, मीना शेडगे, नथू चौधरी, सुरेश डाळ, अरुण डाळ, साहेबराव बरकाले, संतोष मोरे, किसन डाळ, अरुण पवार, सुनील डाळ आदी या वेळी उपस्थित होते. दुपारी कुस्त्यांचे जंगी मैदान पार पडले. प्रथम क्रमांकाची कुस्ती अक्षय चोरगे आणि विजय पवार यांच्यात झाली. ही लढत बरोबरीत सोडविण्यात आली. 25 हजारांचे बक्षीस विभागून देण्यात आले. द्वितीय क्रमांकाची कुस्ती आप्पा मोडवे विरुद्ध प्रसाद थिटे यांच्यात झाली. यात मोडवे विजयी झाले.
त्यांना 21 हजारांचे बक्षीस देण्यात आले. तिसर्या क्रमांकाची कुस्ती सुमीत मरगजे विरुद्ध आकाश सातव यांच्यात झाली. यात सातवने बाजी मारली. त्याला 17 हजारांचे बक्षीस देण्यात आले. पंचक्रोशीतील कुस्तीशौकीन या वेळी उपस्थित होते. पंच म्हणून नवनाथ चौधरी, राजगड सहकारी साखर कारखाना संचालक सुधीर खोपडे, दिनकर पवार, मोहन डाळ, दिलीप डाळ, आदेश निकम, निवृत्ती डाळ, दीपक डाळ यांनी काम पाहिले.