

तळेगाव दाभाडे : पुढारी वृत्तसेवा : तळेगाव दाभाडे नगर परिषदेने सन 2022-2023 या आर्थिक वर्षात 85 टक्के करांची वसुली करून जिल्ह्यात करवसुलीमध्ये उच्चांक मिळविला असल्याची माहिती मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी दिली. तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीमध्ये जवळपास एकूण 38,000 मिळकतधारक आहेत. यापैकी जवळपास 32,350 मिळकतधारकांनी आपल्या मिळकतीचा कर भरणा करून नगर परिषदेच्या उत्पन्नामध्ये भर टाकली आहे.
नगर परिषदेकडे 31 मार्चअखेर एकूण 20 कोटी 60 लाख रुपये मिळकत करापोटी जमा होउन यावर्षी एकूण शासकीय- निमशासकीय व न्यायालयीन प्रकरणातील रक्कम वसुली खाती जमा दाखवताना 85 % वसुली करत तळेगाव दाभाडे नगर परिषदेने वसुलीचा उच्चांक गाठला असल्याची माहिती करनिरीक्षक विजय शहाणे यांनी दिली. मात्र, शेवटच्या सत्रात मार्च महिन्यामध्ये थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेतली होती. या सर्व मोहिमेचा परिणाम म्हणूनच मागील आर्थिक वर्षापेक्षा या वर्षामध्ये वसुलीचे प्रमाण अधिक राहिले असून, पुणे जिल्ह्यातील एकूण 17 नगरपालिका, नगरपंचायती यांच्या तुलनेत वसुलीबाबत तळेगाव दाभाडे नगर परिषदेचा अव्वल क्रमांक लागला आहे, असे मुख्याधिकारी सरनाईक यांनी सांगितले.
सहा विशेष पथकामार्फ त कारवाई
तसन 2022-23 मध्ये नगर परिषदेने ऑगस्टपासूनच सर्व नागरिकांना मिळकत कराची देयके पोचविल्यामुळे नियमित कर भरणार्या मिळकत करधारकाने ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यांतच कर भरणा केला होता. उर्वरित मिळकतधारकांसाठी मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक व उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्टोबर महिन्यापासून घरोघरी भेटी देउन कर भरणेबाबत नगर परिषद कर्मचार्यांमार्फत आवाहन केले होते. तसेच जानेवारीपासून शासनाच्या विशेष वसुली मोहिमेअंतर्गत नगर परिषदेने 6 विशेष वसुली पथके नेमून मालमत्ता सील करण्याची कडक कारवाईची मोहीम हाती घेतली होती.
मालमत्ता कराच्या माध्यमातून मिळालेल्या नागरिकांच्या आर्थिक सहकार्यामुळे भविष्यात क्रीडा, शिक्षण, आरोग्य पर्यावरण या क्षेत्रामध्ये नागरिकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी उपयोग होईल.
– विजयकुमार सरनाईक, मुख्याधिकारी, तळेगाव दाभाडे नगर परिषद