

Talegaon Dabhade Municipal Council
तळेगाव स्टेशन : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची निवडणूक नुकतीच पार पडून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली आहे. मात्र अद्याप पाणीपुरवठा, सार्वजनिक आरोग्य, स्थायी, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण-क्रीडा-सांस्कृतिक कार्य, नियोजन व विकास तसेच महिला व बालकल्याण समित्यांचे सभापती व सदस्यांची निवड झालेली नाही. त्यामुळे विकासकामे रखडण्याची शक्यता निर्माण झाली असून नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
नगरपरिषदेची निवडणूक सुमारे नऊ वर्षांनंतर झाली आहे. गेल्या चार वर्षांपासून बहुतांश कारभार प्रशासकीय ताब्यात होता, त्याबाबत नागरिकांमध्ये असंतोष होता. आता नव्या पदाधिकाऱ्यांकडून कारभार सुरळीत व गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र समित्यांच्या गठनात होत असलेल्या दिरंगाईमुळे ही अपेक्षा अपूर्ण राहण्याची भीती व्यक्त होत आहे.
शहरातील पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत असून त्यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. तसेच वाढत्या डासांमुळे मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांचा धोका संभवतो आहे. भटक्या श्वानांचा उपद्रवही वाढला असून त्यावर नियंत्रण आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तळेगाव-चाकण महामार्ग, स्टेशन चौक, जिजामाता चौक, स्वप्ननगरी मार्ग आदी ठिकाणी जीवघेणे खड्डे पडले असून अपुरे डांबरीकरण झाले आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करावीत, अशी मागणी जोर धरत आहे.
समित्यांची निवड न झाल्यास विकासकामांवर परिणाम होऊ शकतो, असे सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस यांनी सांगितले.
दरम्यान, समित्यांच्या निवडीसंदर्भातील बैठक तहकूब झाल्याने नाराजी वाढली आहे. लोणावळा नगरपरिषद व वडगाव मावळ नगरपंचायतीत समित्यांची निवड पूर्ण झाली असताना तळेगाव दाभाडे येथे अद्याप प्रक्रिया प्रलंबित असल्याने नागरिकांत असंतोष असल्याचे माजी नगरसेवक सचिन टकले यांनी नमूद केले आहे. नागरिकांनी तातडीने समित्यांची निवड करून विकासकामांना गती द्यावी, अशी मागणी केली आहे.