

तळेगाव दाभाडे : पुढारी वृत्तसेवा : तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गावर तळेगाव स्टेशन भागात रस्ता दुभाजकामुळे अनेक अपघात होत आहेत; परंतु सुरक्षा यंत्रणा ढिम्म असून अपघातांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याने परिसरातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
महामार्गावरील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त
तळेगाव-चाकण-शिक्रापूर 548 डी हा 54 किलोमीटर टप्प्यातील राष्ट्रीय महामार्ग भारतीय राजमार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला आहे. या रस्त्यावर होणारी वाहतुकीची वर्दळ लक्षात घेऊन आमदार सुनील शेळके यांनी पुढाकार घेऊन तळेगाव स्टेशन येथील सिंडिकेट बँकेपासून तळेगाव स्टेशन येथील एमएसईबीच्या रस्त्यापर्यंत रस्ता दुभाजक बसविला होता. हा तळेगाव, चाकण, शिक्रापूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केला आहे. तळेगाव स्टेशन येथील एमएससीबीकडे जाणार्या रस्त्यापर्यंत महामार्गावर धोकादायक दुभाजक आहेत.
सुरक्षिततेच्या उपकरणाची कमी
तळेगाव स्टेशन येथील एमएसईबीकडे जाणार्या रस्त्याजवळ या राष्ट्रीय महामार्गावर रस्ता दुभाजकाची सुरुवात होत आहे. या रस्त्यावर सुरुवातीला रिप्लेट किंवा सिग्नलची कायमस्वरूपी व्यवस्था करणे गरजेचे होते; परंतु आजतागायत या ठिकाणी या सुरक्षिततेच्या उपकरणाची महामार्गाच्या प्रशासनाकडून व्यवस्था न झाल्याने रात्रीच्या वेळेस समोरासमोर येणार्या
वाहनांच्या लाईटमुळे हा रस्ता दुभाजक दिसत नाही. त्यामुळे अनेक लहान-मोठे अपघात होत आहेत. यामध्ये अनेकांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. तसेच, या ठिकाणी अनेक अपघात
झाले आहेत.
सिग्नलची व्यवस्था करण्याची मागणी
तळेगाव-चाकण-शिक्रापूर हा राष्ट्रीय महामार्ग रांजणगाव एमआयडीसी, चाकण एमआयडीसी, तळेगाव एमआयडीसी यांना जोडलेला असलेल्या या रस्त्यावर अवजड वाहनाची वाहतूक नेहमी सुरू असते. तसेच, तळेगाव स्टेशन परिसरामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केला असता दुचाकी, चारचाकी, रिक्षाने या रस्त्याने जाणारे महिला, नागरिक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी रस्ता दुभाजक सुरू झाला आहे. त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने महामार्ग प्राधिकरणाने त्वरित रिप्लेट किंवा सिग्नलची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.