दुर्देैवी ! सेल्फी काढणं बेतलं जीवावर; बहिणींना वाचविणार्‍या भावाचा बुडून मृत्यू

दुर्देैवी ! सेल्फी काढणं बेतलं जीवावर; बहिणींना वाचविणार्‍या भावाचा बुडून मृत्यू

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : पानशेत धरणाच्या वेगाने वाहणार्‍या सांडव्यातील पाण्यात उतरून सेल्फी काढताना बुडणार्‍या दोन बहिणींना वाचविताना सख्ख्या भावाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर बालाजी मनाळे (वय 18, रा. खराडी) असे मृत्यू झालेल्या भावाचे नाव आहे. अनुसया बालाजी मनाळे व मयूरी बालाजी मनाळे, अशी बहिणींची नावे आहेत. ज्ञानेश्वर हा आपल्या बहिणी व मित्र-मैत्रिणींसह पानशेत परिसरात फिरण्यासाठी आला होता. सर्वजण दुचाकीवरून पानशेतहून माघारी जात असताना धरणाच्या सांडव्यातील पाण्याच्या कडेला उभे राहून ते सेल्फी काढत होते.

त्या वेळी अनुसया ही पाय घसरून पाण्यात पडली. तिला बाहेर काढण्यासाठी तिची बहीण मयूरीही पाण्यात उतरली. मात्र, वेगाने वाहणार्‍या पाण्यात दोघी बुडू लागल्या. त्या वेळी त्यांना वाचविण्यासाठी ज्ञानेश्वरने पाण्यात उडी मारली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने काही क्षणात ज्ञानेश्वर बुडून बेपत्ता झाला. त्यानंतर घटनास्थळी असलेल्या साईराज रायरीकर व करण चव्हाण या स्थानिक युवकांनी पर्यटकांच्या मदतीने दोघींना सुखरूप पाण्याबाहेर काढले.

घटनेची माहिती मिळताच पानशेत पोलिस चौकीचे पोलिस हवालदार पकंज मोघे, अंमलदार कांतीलाल कोळपे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सह्याद्री आपत्ती व्यवस्थापनाचे पथक तसेच पुणे महानगर प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. त्यानंतर दोन तासांच्या शोध मोहिमेनंतर सायंकाळी पाचच्या सुमारास सांडव्याच्या एका बाजूला खोल पाण्यात ज्ञानेश्वरचा मृतदेह सापडला. मृतदेह बाहेर काढून तीरावर आणला. शवविच्छेदनासाठी मृतदेह पुण्यात रुग्णालयात नेण्यात आला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news