निमोणे: रामोशी समाजाच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन पुणे जिल्ह्यासह राज्यभरात गावगुंडांनी रामोशी वतनी जमिनी लुटल्या आहेत. शिवकाळापासून गावगाड्याशी इमान राखणाऱ्या रामोशी समाजावर अन्याय करणार्या गावगुंडांवर कारवाई करा, अशी मागणी जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.
पुणे येथे दौलतनाना शितोळे यांच्या नेतृत्वाखाली रामोशी समाजाच्या शिष्टमंडळाने महसूलमंत्री बावनकुळे यांची भेट घेऊन निवेदन दिले. रामोशी समाजाच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन दहशतीच्या जोरावर गावगुंडांनी खोट्या कागदपत्रांच्या सह्यांनी वतनी जमिनी लुटण्याचा सपाटा लावला तसेच शेतसारा भरला नाही म्हणून सरकारने देखील अनेक रामोशी वतनी जमिनी सरकारजमा केल्या आहेत. (latest pune news)
रामोशी समाजाच्या मागण्यांना तत्काळ न्याय देण्यासाठी पुढील आठवड्यात मंत्रालयात विशेष बैठकीचे आयोजन करू व राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना रामोशी वतनी जमिनींसह सगळ्याच वतनी जमिनींच्या व्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश देऊ. सरकार गरिबांना लुटणाऱ्या गावगुंडांना सुतासारखे सरळ करेल, अशी स्पष्ट ग्वाही महसूलमंत्री बावनकुळे यांनी शिष्टमंडळाला दिली.