

भवानीनगर: श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याला गतवैभव प्राप्त होण्यासाठी सर्व प्रकारे साथ देण्याची आपली तयारी आहे. ज्या काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत, त्या सोडविण्यासाठी सर्वस्व पणाला लावू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
श्री छत्रपती कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी भवानीनगर येथे भवानीमातेच्या मंदिरामध्ये श्री जय भवानीमाता पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी पवार बोलत होते. या वेळी क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर, श्री छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, सोमेश्वर कारखान्याची अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे आदी उपस्थित होते. (latest pune news)
पवार म्हणाले, श्री छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत मी भागच घेणार नव्हतो. परंतु, अडचणीच्या वेळी रणांगण सोडणे हा पळपुटेपणा आहे. त्यामुळे सोमेश्वर कारखान्याप्रमाणे छत्रपती कारखान्याला अडचणीतून बाहेर काढावा लागणार आहे. क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी अभ्यासू नेतृत्वाची गरज आहे. कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सर्वपक्षीय पॅनल उभे केलेले आहे.
पृथ्वीराज जाचक म्हणाले, श्री छत्रपती कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणे गरजेचे होते. इतर साखर कारखान्यांचे तोडणी वाहतुकीचे करार सुरू झालेले आहेत. आपल्या कारखान्याची निवडणूक होण्यासाठी जून महिना उजाडणार आहे. आपला प्रपंच सावरण्यासाठी कारखाना बिनविरोध करायचा होता. अजित पवार यांच्याबरोबर आम्ही खुल्या दिल्याने शत्रुत्व केले व मित्रत्वही केले. आगे आगे देखो होता है क्या, असा टोला पृथ्वीराज जाचक यांनी विरोधकांना लगावला.