

जळोची; पुढारी वृत्तसेवा : बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाची देशातील सर्व सुविधायुक्त महाविद्यालय म्हणून ओळख सांगितली जाते, मात्र प्रत्यक्षात गैरसोय व असुविधेमुळे एका रुग्णाला मनस्ताप सहन करावा लागल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. रुग्णालयात एक्स-रे-शीटसुद्धा उपलब्ध नसताना येथील डॉक्टरांनी रुग्णाला चक्क एक्स-रे-चा फोटो मोबाईलमध्ये काढून तो उपचार करणार्या दुसर्या डॉक्टरांना दाखविण्यास सांगितले. या प्रकारामुळे रुग्णालयाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी सूरज चौधर यांचा अपघात झाला, हातास मार बसला. एक्स-रे- काढण्यासाठी ते बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात गेले. या वेळी तेथील डॉक्टरांनी चौधर यांच्या हाताचा एक्स-रे काढला. मात्र एक्स-रे-चे शीट उपलब्ध नसल्याने त्यांनी चौधर यांना एक्स-रे-चा फोटो मोबाईलमध्ये काढून उपचार करणार्या डॉक्टरांना दाखवा, असे सांगितले. तसेच मोबाईलवरील एक्स-रे-चा फोटो पाहून डाव्या हाताच्या एका बोटाला इजा झाल्याचे सांगत प्लास्टर केले.
चार-पाच दिवसांनी सूज कमी न झाल्याने तसेच वेदना जास्त होऊ लागल्याने चौधर हे शहरातील खासगी डॉक्टरकडे उपचारासाठी गेले. या वेळी एक्स-रे काढला असता तीन बोटे फ—ॅक्चर झाल्याचे निदान झाले, त्यामुळे त्यांना नव्याने प्लास्टर करावे लागले.
शासकीय महाविद्यालयात कोट्यवधी रुपयांचे नवीन एक्स-रे मशीन असताना केवळ शीट उपलब्ध नाही म्हणून मोबाईलमध्ये फोटो घेत चौधर यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, तरीही अचूक निदान झाले नाही, असा आरोप करत या प्रकारामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे यास जबाबदार असणार्या डॉक्टरांसह संबंधित वैद्यकीय अधिकार्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी चौधर यांनी केली आहे. दरम्यान याबाबत संबंधित डॉक्टरांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र ते उपलब्ध झाले नाहीत.
अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शासनाचा निधी रुग्णालयाला येत आहे, परंतु त्याचा उपयोग सर्वसामान्य रुग्णांना होत नाही. रुग्णांच्या जिवाशी खेळले जात असून प्रशासनावर कारवाईची मागणी पवार यांच्याकडे करणार असल्याचेही चौधर यांनी सांगितले.
खासगीत जाण्याचा सल्ला
अनेक कर्मचारी, डॉक्टर वेळेवर येत नाहीत, अचानक रजा घेतात. ऑन ड्यूटी इतर हॉस्पिटलला काम करतात. अनेकदा खासगी डॉक्टर व रुग्णालयात रुग्णांना उपचारासाठी पाठविले जाते. अनेक मशिनरी उपलब्ध असताना त्या बंद आहेत, साहित्य उपलब्ध नाही, अशी उत्तरे दिली जात आहेत..
– महेश शेंडगे, रुग्णमधल्या काळात एक्स-रे शीट (फिल्म) चा तुडवडा होता. त्याबाबत मागणी केली होती. त्यामुळे मोबाईल फोटो घेत होतो. त्यामध्ये सूक्ष्म क्रॅक दिसत नाही. यापूर्वी रुग्णांना एक्स-रे शीट दिल्या आहेत व या पुढेही देणार आहोत. रुग्णांना उत्तम सेवा देण्यासाठी कटिबद्ध राहू.
– डॉ. राजेश उमाप, वैद्यकीय महाविद्यालय, बारामती