पुणे : सिंथेटिक ट्रॅक तयार, मात्र खेळता येईना !

पुणे : सिंथेटिक ट्रॅक तयार, मात्र खेळता येईना !
Published on
Updated on

सुनील जगताप

पुणे : सारसबागेजवळील बाबूराव सणस मैदानामध्ये अत्याधुनिक पद्धतीचा सिंथेटिक ट्रॅक बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, प्रशासनाकडून मैदानाच्या उद्घाटनासाठी 'तारीख पे तारीख' दिली जात आहे. परिणामी, मैदान तयार असतानाही खेळाडूंना सराव करता येत नाही. सणस मैदानामध्ये 2006 मध्ये सिंथेटिक ट्रॅक सुविधा बसविण्यात आली होती. त्याला 15 वर्षांहून अधिक काळ झाल्याने त्याची दुरवस्था झाली. त्यातच 2019 मध्ये पीएमपीएमएलच्या एका कार्यक्रमामध्ये ट्रॅकवरच बस उभ्या करण्यात आल्याने ट्रॅक खराब झाला.

त्यामुळे मैदानात खेळण्यासाठी, भरतीची तयारी करण्यासाठी येणारे उमेदवार व खेळाडूंची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती.
महापालिका प्रशासनाच्या वतीने खेळाडूंची होणारी हेळसांड पाहून मे 2022 मध्ये सणस मैदानाच्या ट्रॅकचे काम हाती घेतले गेले. संबंधित ठेकेदाराला सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. या मैदानावर ट्रॅकसह इतर सर्व कामे मार्च महिन्यापूर्वीच झाली. असे असतानाही सणस मैदानाचे उद्घाटन झालेले नाही. परिणामी, खेळाडूंसाठी मैदान उपलब्ध होत नाही. यात खेळाडूंचे मोठे नुकसान होत असून, प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा खेळाडूंसह प्रशिक्षकांनी व्यक्त केली आहे.

अधिकारी अनभिज्ञ

बाबूराव सणस क्रीडा संकुल पुणे मनपाच्या क्रीडा विभागाच्या ताब्यात आहे. मात्र, सध्या दुरुस्तीचे काम भवन विभागाकडून केले जाते. क्रीडा विभाग आणि भवन विभागातील अधिकार्‍यांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे या कामाची माहिती कोणत्याही अधिकार्‍याला नसल्याचे समोर आले आहे.

सिंथेटिक ट्रॅक नव्याने बसविण्यासाठी मे 2022 मध्ये मैदानात खेळाडूंना प्रवेश दिला जात नव्हता. सध्या ट्रॅक बसवून इतरही कामे पूर्ण झालेली आहेत. परंतु, अद्यापही खेळाडूंसाठी ट्रॅक खुला करण्यात आलेला नाही. याबाबत अधिकार्‍यांकडे सरावासाठी ट्रॅक उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. मैदानाच्या उद्घाटनाची तारीख तीन वेळा बदलली आहे. त्यामुळे थेट आयुक्तांकडेच मैदान उपलब्ध करून देण्याची मागणी केलेली आहे.

                             – संदीप कदम, प्रशिक्षक, अ‍ॅथलेटिक्स

नव्याने सिंथेटिक ट्रॅक बसविण्याचे काम सुरू असले, तरी उद्घाटनाबाबत भवन विभागाच्या अधिकार्‍यांनाच अधिक माहिती असेल. त्यांच्याकडून कामाबाबत कोणतीच माहिती आमच्या विभागाला लेखी स्वरूपात आलेली नाही. त्यामुळे त्याबाबत अधिक माहिती देऊ शकणार नाही.

                                                  – डॉ. नयना केरुरे,
                                             क्रीडा उपायुक्त, पुणे म.न.पा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news