

हिरा सरवदे
पुणे : 'महापालिकेच्या जलतरण तलावाची लाखो रुपये थकबाकी ठेवणारे मोठे पाच ठेकेदार 'हिटलिस्ट'वर असून, या थकबाकीदार संस्थांच्या मालमत्तेची माहिती महापालिकेने धर्मादाय आयुक्तांकडे मागितली आहे. यासाठी महापालिकेने धर्मादाय आयुक्तांना पत्र दिले असून, संबंधित संस्थेच्या नावावर मालमत्ता नसल्यास पदाधिकार्यांच्या मालमत्तेवर बोजा चढवण्यात येणार आहे,' अशी माहिती क्रीडा विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे यांनी दिली आहे.
महापालिकेच्या मालकीचे जलतरण तलाव हे ठेकेदार पद्धतीने चालविण्यास दिले जातात. यासाठी निविदा प्रक्रीया राबविली जाते, जादा दराने भाडे देणार्या संस्था, ठेकेदाराला जलतरण तलाव चालविण्यास दिला जातो. परंतु पाच जलतरण तलावांचे लाखो रुपयांचे भाडेच महापालिकेकडे अद्याप जमा झाले नाही. असे पाच जलतरण तलाव चालविण्यास घेणार्या तीन संस्था, दोन ठेकेदारांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे.
थकीत भाडे वसुल करण्यासाठी संबंधित संस्था, संस्थेच्या पदाधिकारी आणि ठेकेदाराच्या मिळकतींवर बोजा चढविला जाणार आहे. मुदत संपल्यानंतरही संबंधित ठेकेदार, संस्था यांनी महापालिकेकडे भाडे भरले नाही. तसेच जलतरण तलावाचा ताबाही दिला नाही. यामुळे गेल्यावर्षी क्रिडा विभागाने संबंधितांना ताबा सोडण्याची नोटीस दिली होती. थकीत भाडे वसुलीसाठी संबंधितांच्या मालमत्तेवर टाच आणण्याचा प्रस्तावही क्रिडा विभागाने आयुक्तांना पाठविला होता.
दरम्यानच्या कालावधीत संबंधित ठेकेदार आणि संस्थांनी थकबाकी भरण्यासाठी मुदतवाढ मागितली होती. ही मुदत संपल्यानंतरही थकबाकी न भरल्यामुळे क्रिडा विभागाने आता कठोर पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून महापालिकेने संबंधित ठेकेदार संस्थांच्या नावे मिळकती आहेत का, अशी विचारणा पत्राद्वारे धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे. संस्थेच्या नावे मिळकती आहेत, असे धर्मादाय आयुक्तांनी कळविल्यास त्या मिळकतींवर बोजा चढविला जाणार आहे. तसेच मिळकती नाहीत असे कळविल्यास संस्थेच्या पदाधिकार्यांच्या नावे असलेल्या मिळकतींवर बोजा चढविला जाणार असल्याचे वारुळे यांनी सांगितले.
पाच ठेकेदारांनी थकविले दोन कोटी
येरवडा येथील नानासाहेब परुळेकर जलतरण तलाव आणि व्यायामशाळा, शिवाजीनगर येथील जलतरण तलाव हे सर्वोदय प्रतिष्ठान या संस्थेला चालविण्यास दिले होते. या जलतरण तलाव आणि व्यायामशाळेचे अनुक्रमे 46 लाख 88 हजार रुपये आणि 47 लाख 99 हजार रुपये इतके भाडे थकले आहे.
शुक्रवार पेठेतील स्व. प्रमोद महाजन क्रिडा संकुल हे शिवराय प्रतिष्ठानने भाडेतत्वावर घेतले आहे. त्याचे 14 लाख 65 हजार रुपये इतके भाडे थकले आहे. धनकवडी येथील जलतरण तलाव आणि व्यायामशाळा ही गुंजाळ नावाच्या ठेकेदाराने चालविण्यास घेतली होती. त्याच्याकडे सुमारे 65 लाख 52 हजार रुपये इतकी थकबाकी आहे. वडगाव बुद्रुक येथील वांजळे जलतरण तलाव हा ढगे नावाच्या ठेकेदाराने भाडेतत्वावर चालविण्यास घेतला होता. त्याने सुमारे 21 लाख 16 हजार रुपये इतकी थकबाकी ठेवली आहे.