सांगा, आम्ही पोहायचे कुठे ? घोरपडीतील नागरिकांचा सवाल

सांगा, आम्ही पोहायचे कुठे ? घोरपडीतील नागरिकांचा सवाल
Published on: 
Updated on: 

मुंढवा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : घोरपडी येथील श्रावस्तीनगरमधील महापालिकेचा जलतरण तलाव मागील पाच-सहा वर्षांपासून बंद आहे. तो सुरू करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी वारंवार महापालिकेकडे पाठपुरावा केला. मात्र, प्रशासनाने अद्यापही हा जलतरण तलाव सुरू केला नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. राजमाता जिजाऊ क्रीडा संकुलामध्ये असलेल्या या जलतरण तलावाची सध्या दुरवस्था झाली आहे. तलावामध्ये दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत.

रात्रीच्या वेळी येथे दारू पार्ट्या होत आहेत, त्यानंतर दारूच्या बाटल्या तलावातील पाण्याच्या डबक्यात फेकल्या जातात. त्यामुळे या ठिकाणी दारूच्या बाटल्यांचा खच साचला आहे. तसेच परिसरात गवतही वाढले आहे. जलतरण तलावाच्या परिसरात कचरा साचल्याने दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या भागात दुसरा जलतरण तलाव नसल्याने मुलांनी पोहायला कुठे शिकायचे, असा प्रश्न परिसरातील रहिवाशांनी उपस्थित केला आहे.

धोकादायक कालव्यात उड्या

मागील काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. दुपारच्या वेळी अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. अशा वेळी घोरपडी परिसरातील अनेकांना पोहायला जाण्याची इच्छा असते. मात्र, या ठिकाणी दुसरा जलतरण तलाव नसल्याने त्यांना पोहण्यासाठी धोकादायक असलेल्या कालव्यामध्ये उड्या माराव्या लागत आहेत.

जलतरण तलावांच्या देखभाल व दुरुस्तीचे काम मनपाच्या भवन विभागाकडून केले जाते. घोरपडी येथील जलतरण तलावाबाबत भवन विभागाला कळविण्यात आले असून हा तलाव सुरू करण्यासाठी क्रीडा विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.

                                                                         – चेतना केरूरे,
                                                        उपायुक्त, क्रीडा विभाग, महापालिका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news