

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दिग्गज कलाकारांसमवेत असलेली पंडित भीमसेन जोशी यांची प्रकाशचित्रे… त्यासोबतच सतीश पाकणीकर यांनी टिपलेली भीमसेनी मुद्रा अन् पंडितजींची कुटुंबासोबत असलेली विविध क्षणचित्रे …असा स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांचा जीवनप्रवास रसिकांना अनोख्या प्रकाशचित्रांमधून पाहायला मिळत आहे. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात आयोजिलेल्या शताब्दी स्मरण हा प्रकाशचित्र प्रदर्शनाला रसिकांची पसंती मिळत असून, कृष्णधवल प्रकाशचित्रातून पंडितजींचा अनोखा स्वरप्रवास रसिकांसमोर उलगडत आहे. पंडित भीमसेन जोशी यांच्या जीवनातील विविध घटनांचा पट या प्रकाश चित्रांमधून उलगडत आहे.
यंदाच्या महोत्सवात पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने शताब्दी स्मरण हे प्रकाशचित्र प्रदर्शनही आयोजित केले आहे. दिवंगत ज्येष्ठ प्रकाशचित्रकार अनिल देशपांडे व सुधाकर जोशी तसेच सतीश पाकणीकर यांच्या संग्रहातील अनेक प्रकाशचित्रांतून काळाच्या पडद्याआड गेलेली मैफल पुन्हा एकदा रसिकांना अनुभवता येत आहे. पंडित वसंतराव देशपांडे, पंडित राजन आणि साजन मिश्रा, पंडित आनंद भाटे अशा विविध कलाकारांसोबत असलेली पंडितजींची प्रकाश चित्रे यात पाहायला मिळतील.
खासकरून यावर्षी हे प्रदर्शन पं. भीमसेन जोशी यांच्या प्रकाशचित्रांवर आधारित आहे. महोत्सवाचे मुख्य आयोजक पं. भीमसेन जोशी व आपली कला सादर करायला येणारे भारतभरातील कलाकार यांच्यातील स्नेहाचे, एकमेकांच्या कलांना दाद देतानाचे, सत्काराचे, आदराचे, प्रेमाचे संबंध किती अतूट होते हे या प्रदर्शनात पाहता येईल. पंडितजी व अन्य कलाकार यांच्या प्रकाशचित्रांसह पाकणीकर यांच्या कॅमेर्याने टिपलेल्या 'भीमसेनी मुद्रा' ही या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण आहे.