पुणे : राज्यातील काही नेतेमंडळी महाराष्ट्र स्वराज्य पक्ष हा भाजपची बी टीम आहे, असा प्रचार करत आहेत. तसे काही संदेश पण मला आले. मात्र, महाराष्ट्र स्वराज्य पक्ष हा भाजपची बी टीम नाही अशी स्पष्टोक्ती छत्रपती संभाजीराजे यांनी पुणे येथील मेळाव्यामध्ये केली. त्याचप्रमाणे येत्या निवडणुकीत समविचारींना अन् विस्तापितांना सोबत घेऊन प्रस्थापितांना धडा शिकवू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या स्थापना दिन सोहळयानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी पक्षाचे सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव, उपाध्यक्ष अंकुश जाधव, रघुनाथ चित्रे पाटील, महादेव तळेकर यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीत मी काँग्रेसचा प्रचार केला तेव्हा भाजपची बी टीम का म्हणाले नाही. थेट पंतप्रधान यांना मी शिवस्मारकाबाबत जाहीर प्रश्न केला. हा प्रश्न विचारण्याची कुणाची हिंमत झाली नाही. प्रत्येकाला तुरुंगात जाण्याची भीती असते. मग स्वराज्य पक्ष भाजपची बी टीम कशी होईल. राजकारण माझा पिंड नाही. पण, राजकारणात चांगली लोक यावीत म्हणून मी राजकारणात आलो आहे. समाविचारींना बरोबर घेऊन परिवर्तन महाशक्ती तयार करून विधानसभा जिंकणार, असा निर्धार ही संभाजीराजे यांनी यावेळी व्यक्त केला. संभाजीराजे म्हणाले, राज्यात सध्या सहकार क्षेत्राचे खासगीकरण झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांकडेच साखर कारखाने आहेत. शरद पवार, रोहित पवार, पंकजा मुंडे, विनय कोरे, धनंजय मुंडे, अजित पवार यांच्याकडे किती साखर कारखाने आहेत याची माहिती घ्या. सहकार हा मोडीत काढण्याचा प्रकार सुरु असल्याची टिका ही त्यांनी यावेळी केली.
केंद्र सरकारने मराठी भाषेला आभिजात भाषेचा दर्जा दिला, ही आनंदाची आणि कौतुकाची बाब आहे. मात्र किती जिल्हा परिषद अथवा मराठीच्या शाळा अस्तित्वात आहेत. आरोग्य, शिक्षणावर आपण किती खर्च करतो, लाडकी बहिण योजनेवर किती खर्च करतो याचाही विचार व्हावा. शेतकर्यांना वार्षिक निधी सरकार देते मात्र दुसर्या बाजुला सर्व खते-बियाणे यावर जीएसटीच्या मार्फत परत वसुली करीत आहे. आमच्या पक्षाला आणि आम्हाला तुच्छ लेखले जात आहे. परंतु, आम्ही आगामी काळात आमच्या कामातून आणि कर्तृत्वानेच त्यांना उत्तर देऊ, असा टोलाही संभजीराजे यांनी शरद पवारांना लगावला.
छत्रपती संभाजीराजे यांचा आज पक्ष स्थापनेनिमित्त काही फ्लेक्स पक्षाच्या वतीने लावण्यात आले आहेत. मात्र, पोलिस आणि मनपा प्रशासनाच्या वतीने यावर कार्यवाही करण्यात आली आहे. वास्तविक अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारक पाहणी दौर्यावेळी ही अशाच प्रकारे दडपशाही करण्यात आली होती. परंतु, महाराष्ट्र स्वराज्य पक्ष आणि पक्षाचा प्रत्येक मावळा अशा दडपशाहीला घाबरणार नाही, असा इशाराही पक्षाचे सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव यांनी यावेळी दिला.