वडगाव मावळ : 'भात' पिकाचे प्रमुख आगार म्हणून ओळखल्या जाणार्या मावळ तालुक्यातील 'इंद्रायणी' वाणाचे भात खरेदी करण्याचा अनोखा उपक्रम जिल्हा बँक व सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आला. खुल्या बाजारात भाताचे दर 5 ते 6 रुपयांनी आपोआप वाढल्याने आमदार सुनील शेळके व जिल्हा बँकेचे संचालक माऊली दाभाडे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेला हा उपक्रम सुरू होण्यापूर्वीच फायदेशीर ठरल्याचे दिसत आहे.
आमदार शेळके यांच्या संकल्पनेतून व जिल्हा बँकेचे संचालक माऊली दाभाडे यांच्या पुढाकाराने मावळ तालुक्यातील चार विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून जिल्हा बँकेच्या सहकार्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते या भात खरेदी उपक्रमाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. इंद्रायणी वाणाच्या भाताला ग्राहकांची वेगळीच पसंती असून मावळ तालुक्यातच इंद्रायणीचे वाण आता संपूर्ण देशभरात पसरले आहे. परंतु, या वाणाला बाजारपेठेत अपेक्षेप्रमाणे दर मिळत नव्हता. व्यापारी इंद्रायणी भात 18 ते 19 रुपये दराने शेतकर्यांकडून खरेदी करत होते. 19 रुपयांचे उच्चांकी दरही दर्जेदार भातालाच मिळत होता.
दरम्यान या उपक्रमांतर्गत सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकर्यांकडून 23 रुपये प्रतिकिलो दराने भात खरेदी करण्याचे निश्चित करण्यात आले आणि बाजारपेठेत आपोआप भाताचे दर वाढले. पूर्वी 18 ते 19 रुपये दराने भात खरेदी करणारे व्यापारी तेच भात आता 23 ते 26 रुपये दराने खरेदी करू लागले आहेत. बाजारपेठेत अचानक झालेल्या दराच्या बदलामुळे तसेच भात विक्रीसाठी हक्काचे ठिकाण मिळाल्याने मावळ तालुक्यातील शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर भविष्यात तालुक्यातील भात उत्पादनामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
विकूनऐवजी पिकवून समृद्ध व्हा : माऊली दाभाडे
मावळ तालुक्यातील शेतकर्यांनी यापूर्वी कवडीमोल भावाने जमिनी विकल्या आहेत, अलीकडच्या काळात जमिनीचे भाव वाढले असले तरी अचानक आलेला पैसा मौजमजा करून आज रोजंदारी करण्याची वेळी शेतकर्यांवर आली आहे. त्यामुळे शेतकर्यांनी जमिनी विकून समृद्ध होण्याऐवजी त्याच जमिनीत धान्य पिकवून समृद्ध व्हावे, असे आवाहन माऊली दाभाडे यांनी केले.
आता व्यापारी लागलेत शेतकर्याच्या मागे !
यापूर्वी भातकाढणी झाल्यावर झोडणी होईपर्यंत शेतकर्यांना भात विक्री करण्यासाठी व्यापार्यांच्या दारोदार फिरावे लागत होते. परंतु हा उपक्रम राबविण्याचा निर्णय झाला आणि व्यापारीच भात खरेदी करण्यासाठी शेतकर्यांच्या मागे लागला असल्याचा अनुभव मावळात पहावयास मिळत असल्याचे शेतकरी गणपत भानुसघरे यांनी पुढारीशी बोलताना सांगितले.
आमदार शेळकेंनी केली एक रुपयाने वाढ !
.
या उपक्रमांतर्गत भात खरेदीसाठी प्रतिकिलो 23 रुपये दर जाहीर केल्याने व्यापार्यांनी लगेच 5 ते 6 रुपयांनी दर वाढवले, हे या उपक्रमाचे यश असल्याचे सांगून आ. शेळकेंनीएक रुपयाची वाढ करून प्रतिकिलो 24 रुपये दराने भात खरेदी करणार असल्याचे जाहीर केले.