

शिवनगर: बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना हा राज्यात उच्चांकी ऊसदर देणारा कारखाना म्हणून ओळखला जातो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारखान्याच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तातडीने काही निर्णय घेतले. त्यामुळे दादांच्या मार्गदर्शनाखाली ’माळेगाव’ची शाश्वत विकासाकडे वाटचाल सुरू असल्याचे संचालक नितीन सातव यांनी सांगितले.
सातव म्हणाले की, माळेगाव कारखान्याची गाळपक्षमता वाढवली आहे. मात्र, कारखान्याचे कार्यक्षेत्र तुलनेने कमी आहे. त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस जेमतेम 7 ते 8 लाख मेट्रिक टन उपलब्ध होतो, तर जवळपास 5 ते 7 लाख मेट्रिक टन उसासाठी कारखाना प्रशासनाला गेटकेनच्या उसावर अवलंबून राहावे लागते. (Latest Pune News)
दुसरीकडे, आजूबाजूच्या सर्वच कारखान्यांनी स्वतःची गाळपक्षमता वाढविल्यामुळे जास्तीचा ऊस मिळण्यासाठी जिकिरीचे प्रयत्न करावे लागतात. काहीवेळा गेटकेनचा ऊस जास्तीच्या अंतरावरून आणावा लागतो. त्यामुळे ऊस वाहतुकीचा खर्च वाढून ऊसदरावर परिणाम होतो. दरम्यान, ऊसतोडणी व वाहतुकीचे दर देखील वाढले आहेत.
त्याचा विचार करता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने निर्णय घेत शास्वत ऊस उत्पादनवाढ समिती नेमून त्याअंतर्गत कारखान्याच्या कार्यक्षेत्रातच अधिकची ऊस लागवड तसेच एकरी जास्तीचे उत्पादन, यावर भर देण्याचे ठरले.
त्या अनुषंगाने उसाच्या वेगवेगळ्या जातीचे बेणे, जमिनीचा पोत, खतांची मात्रा, ठिबक सिंचन याचा अभ्यास करून एआय तंत्राच्या माध्यमातून कारखान्याच्या कार्यक्षेत्रातच जास्तीचे उसाचे पीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात कारखान्याचा हा उपक्रम गेमचेंजर ठरणार असल्याचे मत सातव यांनी व्यक्त केले.