वेल्हे: खडकवासला धरणसाखळीतून मुठा नदीच्या पात्रात सोडण्यात येत असलेला विसर्ग शनिवारपासून पूर्णपणे बंद करण्यात आला. पानशेत-वरसगाव खोर्यासह सिंहगड खडकवासला भागात शनिवारी (दि.30) सकाळपासून ऊन पावसाचा लपंडाव सुरू आहे. सायंकाळी पाच वाजता खडकवासला धरणसाखळीत 28.49 टीएमसी म्हणजे 97.73 टक्के साठा झाला होता. (Latest Pune News)
शनिवारी दिवसभराच्या उघडिपीनंतर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पानशेत सिंहगड भागात तासभर दमदार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पुन्हा उघडीप दिली. धरणक्षेत्रात पावसाळी वातावरण कायम आहे. मात्र, तुरळक पावसानंतर ऊन पडत आहे. शनिवारी दिवसभरात चारही धरणमाथ्यावर पावसाची नोंद झाली नाही.
खडकवासला धरणशाखेच्या शाखा अभियंता गिरीजा कल्याणकर -फुटाणे म्हणाल्या, धरणक्षेत्रात जोरदार पाऊस नसल्याने पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे मुठा नदीत पाणी सोडणे बंद केले आहे. शेतीसाठी मुठा कालव्यात 1 हजार 5 क्युसेक्सने तसेच शहर व परिसराला पिण्यासाठी 400 क्युसेक्सने पाणी खडकवासलातून सोडले जात आहे. वरील तिन्ही धरणातून पाणी सोडले जात असल्याने पाण्याची तुट भरून निघत आहे.