

पुणे: हॉटेलमधील अवैध हुक्का विक्रीबाबत पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची कडक भूमिका आहे. मात्र, असे असताना देखील स्थानिक पोलिसांकडून प्रोटेक्शन मनी घेऊन ‘दम मारो... दम’ला अभय दिले जात असल्याचे दिसून आले आहे.
काळेपडळ पोलिस ठाण्यातील एका श्रेणी पोलिस उपनिरीक्षकांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. शरद निवृत्ती नवले असे त्यांचे नाव आहे. हॉटेलमालकाला बेकायदेशीर हुक्का विक्री करण्यास प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून 90 हजार रुपये घेतल्याचा आरोप नवले यांच्यावर आहे. पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत.(Latest Pune News)
त्याबाबत श्रेणी पोलिस उपनिरीक्षक शरद नवले यांच्याशी बोलणे झाले होते. त्याने हुक्का बार सुरू केल्याबद्दल गुडलकचे 30 हजार व एप्रिल महिन्याचे 30 हजार रुपये असे 60 हजार रुपये 10 एप्रिल 2025 रोजी रोख स्वीकारले होते.
त्यानंतर त्यांच्या ओळखीचे हनुमंत गायकवाड पाटील यांनी हॉटेलमालकला 12 मे रोजी फोन करून नवले यांनी 30 हजार रुपये पाठविण्यास सांगितले आहे, असे सांगितले. त्यांच्यामार्फत ऑनलाइन 30 हजार रुपये स्वीकारले.
शरद नवले याने हॉटेलमालकाला बेकायदेशीरपणे हुक्का विक्री करण्यास प्रोत्साहन देऊन त्याबदल्यात त्याच्याकडून 90 हजार रुपये स्वीकारल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन केल्याने शरद नवले याला पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी निलंबित केले आहे.
पाहा काय आहे नेमका प्रकार..?
महंमदवाडीतील बीबीसी रुफटॉप किचन अँड बारमधील हुक्का पार्लरवर गुन्हे शाखा व काळेपडळ पोलिसांनी कारवाई केली होती. येथे 16 टेबलांवर 57 तरुण-तरुणी हुक्का पित असल्याचे आढळून आले होते. या हॉटेलचा मालक पार्थ अनिल वाल्हेकर याची पोलिसांनी चौकशी केली. त्या वेळी त्याने सांगितले की, एप्रिल 2025 मध्ये हॉटेलमध्ये हुक्का विकण्यास सुरुवात केली.
...तरी धडा घेतला नाही
दरम्यान, यापूर्वी देखील वानवडी पोलिस ठाण्यातील परिविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक आणि कर्मचार्याला देखील हुक्का प्रकरणात निलंबित करण्यात आले होते. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अवैध हुक्का पार्लरवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
मात्र, तो मेसेज संबंधित हुक्कावाल्याला पाठवून कारवाई करण्यापूर्वीच हे दोघे सावध करीत होते. त्यांच्या या हप्तेखोरीचा प्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर दोघांना निलंबित करण्यात आले होते. परंतु, त्यानंतर देखील काळेपडळ पोलिस ठाण्यातील श्रेणी पोलिस उपनिरीक्षकाने प्रोटेक्शन मनी घेतल्याचा प्रकार समोर आला.