पुणे : जितेंद्र आव्हाड यांना राष्ट्रवादीतून निलंबित करा : भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची मागणी

पुणे : जितेंद्र आव्हाड यांना राष्ट्रवादीतून निलंबित करा : भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची मागणी
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नैतिकता असेल, तर त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांना पक्षातून निलंबित करावे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबाबत निर्णय घ्यावा, अशी सूचना त्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

बावनकुळे म्हणाले की, खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी मंत्री अब्दुल सत्तार यांनी वक्तव्य केले होते. आम्ही सत्तार यांचे समर्थन केलेले नाही. आव्हाड यांच्याबाबतचे सीसीटीव्ही चित्रीकरण आहे. आत्ता दिलीप वळसे पाटील गृहमंत्री नाहीत. गृहमंत्रिपद संवेदनशील देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. चित्रीकरण नीट पाहूनच गुन्हा दाखल झाला आहे. अशा घटना घडतात, असे सांगत काही जण आव्हाड यांचे समर्थन करीत आहेत. त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल झाला पाहिजे.

राष्ट्रवादीचे नेते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, असे मत व्यक्त करीत बावनकुळे म्हणाले की, सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता हेच त्यांचे ध्येय असते. राष्ट्रवादीच्या मदतीची आम्हाला गरज वाटत नाही. महाविकास आघाडीला 2024 मध्ये निवडणुकीसाठी उमेदवार भेटणार नाहीत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत व्यासपीठावर चार लोक नसतील. खासदार गजानन कीर्तिकर यांनी विदर्भात शिवसेना वाढविण्यासाठी खूप प्रयत्न केले. असे नेते पक्ष सोडून जात आहेत. उद्धव ठाकरे यांना काय स्वीकारावे ते कळत नाही.

काँग्रेसची घटनाच पक्षाची म्हणून सादर करणार आहेत का? असा माझा त्यांना प्रश्न आहे. शरद पवार यांच्या सल्ल्यामुळे ठाकरे आणि महाराष्ट्राचे वाटोळे झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणूक लढविणार का? यावर ते म्हणाले की, शिंदे व फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युती एकत्रित निवडणूक लढवेल.

केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी बारामतीत दहशत असल्याचे सांगितले होते. त्याला समर्थन असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. 'भारत जोडो' यात्रेला फारसा प्रतिसाद नाही. राज्यात त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांत काही ऊर्जा निर्माण झाल्याचे दिसत नाही. नेत्यांच्या मुलांचे लाँचिंग करण्यासाठी यात्रा सुरू आहे, अशी खोचक टीका बावनकुळे यांनी केली. चित्रा वाघ आणि पत्रकार यांच्यात झालेल्या वादाविषयी विचारणा ते म्हणाले की, त्याच्यात वाद झाला. पत्रकारांचा आदर केला पाहिजे, सहनशीलता ठेवून उत्तर दिले पाहिजे. मी वाघ यांच्याशी बोलणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news