वासुंदे खून प्रकरणातील संशयित अटकेत : दौंड पोलिसांची कारवाई

वासुंदे खून प्रकरणातील संशयित अटकेत : दौंड पोलिसांची कारवाई

कुरकुंभ/पाटस : पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुक्यातील वासुंदे हद्दीत बँकेच्या वसुलीची नोटीस वाटप करणार्‍या प्रवीण मळेकर यांचा खून झाला होता. या प्रकरणात एका संशयिताला दौंड पोलिसांनी अटक केली आहे. दीपक रामदास लोंढे (वय 37, रा. वासुंदे, ता. दौंड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. प्रवीण मळेकर हे एका बँकेच्या बारामती शाखेच्या वसुलीची नोटीस वाटप करण्यासाठी दुचाकी घेऊन बारामतीला गेले होते. दौंड तालुक्यातील वासुंदे गावच्या हद्दीत शुक्रवारी (दि. 1) रात्री अज्ञाताने मळेकर यांच्या पोटात धारदार हत्यार भोसकून खून केला होता.

या संशयिताला शोधण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळे पथक तयार केले होते. सुरुवातीलाच याबाबत काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले होते. त्यानुसार तपासाचे काम पोलिसांनी सुरू ठेवले होते. पोलिसांनी त्या रस्त्यावर संशयित वाहनांची तपासणी करून अनेकांकडे चौकशी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या तपासात वरील परिसरात राहणार्‍या दीपक लोंढे याच्याकडून वारंवार वाहनांवर दगडफेक केली जात होती. ये-जा करणाऱ्यांबरोबर हुज्जत घालण्याचे प्रकार करत होता. घटनेचा सूक्ष्म तपास करताना पोलिसांनी डॉग स्कॉड बोलावून संशयिताचा माग काढून त्याला अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, दौंडचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलिस निरीक्षक राहुल गावडे, अरविंद गटकुळ, तुकाराम राठोड, सहायक फौजदार श्रीरंग शिंदे, शंकर वाघमारे, सुभाष राऊत, पांडुरंग थोरात, सागर म्हेत्रे, नितीन बोराडे, रवी काळे, अमीर शेख, संजय नगरे, अमोल देवकाते आदींनी केली.

वाहनाचा त्रास होत असल्याने केला खून

रस्त्याने ये-जा करणार्‍या वाहनांमुळे मला त्रास होतो. जाणूनबुजून माझ्या अंगावर वाहने घालतात. याचा मला त्रास होतो. या कारणावरून अटक केलेल्या दीपक लोंढे याने रस्त्याने जाणार्‍या प्रवीण मळेकर यांच्यासबोत वाद घालून हातातील धारदार सुरा मारला होता. यात त्यांचा जीव गेला, असे पोलिस तपासात समोर आले आहे.

यापूर्वी दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

या अगोदरही दगड मारणे, शिवीगाळ करणे असे प्रकार अटक केलेला संशयित दीपक लोंढे करत होता. मळेकर खून प्रकरणाच्या काही तासांपूर्वी त्याने गाड्यांवर दगड मारले होते. तसेच मागील एका गुन्ह्यात महिलेला धमकी देण्यासाठी धारदार हत्याराचा त्याने वापर केला होता. तसा दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

मळेकर बँकेचे कर्मचारी नाहीत

मृत प्रवीण मळेकर हे महाराष्ट्र बँकेचे अधिकारी किंवा कर्मचारी नव्हते. त्यांचे मळेकर एंटरप्रायजेस असून, या माध्यमातून ते बँक ऑफ महाराष्ट्र, बारामती शाखेच्या रिकव्हरीचे नोटीस वाटप करत होते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news