

Supriya Sule And Grandmother Demand
पुणे : टीव्हीवर विविध चॅनेलवर मालिका सुरू आहेत. मात्र, या मालिका सुरू असताना मध्ये मध्ये खूप वेळ जाहिराती दाखविण्यात येतात. त्यामुळे मालिका पाहताना डिस्टर्ब होते. ही मालिकांमध्ये दाखविण्यात येणार्या जाहिरातींची वेळ कमी करा, अशी मागणी एका आजीबाईंनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली. आजींच्या त्या अजब मागणीवर सुळे यांना पहिल्यांदा काय उत्तर द्यावे, हेच कळेना. मात्र, त्यांच्या या मागणीवर त्यांना हसू आवरले नाही.
खा. सुप्रिया सुळे सोमवारी (दि. 6) शहरातील रास्ता पेठेतील महावितरण कार्यालयामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी अधिकारी यांच्यासोबत बैठकीचे आयोजन केले होते. त्या वेळी एका आजींनी सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन याबाबत तक्रार केली.
त्या आजीबाई म्हणाल्या की, टीव्ही पाहण्यासाठी पैसे भरतो आणि जाहिरातीच दिवसभर पाहायच्या का? 10 मिनिटांचा कार्यक्रम असतो आणि बाकी 20 मिनिटे जाहिरातीत जातात. मी कुठे तक्रार करू, हेच मला सुचत नाही. योगायोगाने तुम्ही आलात, त्यामुळे तुमच्याकडे मी मागणी केली आहे. जाहिराती बघून वैताग आला आहे.
एक जाहिरात दोनदोनदा दाखवतात. दरम्यान, सीरिअलचा पुढील एपिसोड दाखवत नाही का? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी आजींना विचारला. यावर त्या म्हणाल्या की, थोडंसच दाखवतात. 20 मिनिटांची जाहिरात असते. त्यामुळे काही करता आलं तर बघा, अशी मागणी आजींनी केली. यावर सुप्रिया सुळे यांनी बघते बघते म्हणत आजींना धीर देण्याचा प्रयत्न केला.