

पुणे: धनंजय मुंडे यांच्यावर कौटुंबिक अत्याचाराचा गुन्हा आहे. अनेक वैयक्तिक गुन्हे आहेत. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्यामागे वाल्मीक कराड होते. ते कराडचे आका कोण होते? याची माहिती सुरेश धस यांनी दिली आहे. या ‘आका’मुळे कुटुंबे उद्ध्वस्त झाली. ज्यांनी कर्त्या पुरुषाची अमानुष हत्या केली किंवा त्याची पाठराखण केली, त्यांना महाराष्ट्राच्या निर्णय प्रक्रियेत येऊ देणार नाही, असा इशारा खा. सुप्रिया सुळे यांनी दिला.
निसर्ग मंगल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. सुळे म्हणाल्या, बीडमध्ये हत्या घडत असताना जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होते? ’लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज भरून घेण्याची जबाबदारी असलेल्या आणि या योजनेसाठी सॉफ्टवेअर तयार करणार्या ठेकेदाराची ईडी, सीबीआय व एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी सुळे यांनी केली.गेली 70 वर्षांत जेवढी महाराष्ट्राची बदनामी झाली नाही तेवढी बदनामी या दीडशे दिवसांत झाली आहे, असे सुळे म्हणाल्या. (Latest Pune News)
‘कोकाटेंनी स्वत:हून राजीनामा द्यावा’
एकीकडे ‘लाडकी बहीण’ योजना राबवायची आणि दुसरीकडे राज्यमंत्री महिलेस विरोध करायचा, ही दुटप्पी भूमिका योग्य नाही. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी दुसरे कोणी करण्यापेक्षा त्यांनीच नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, असेही सुळे यांनी सुचविले.
काय म्हणाल्या सुळे?
हिंजवडीसंदर्भातील बैठकांना बोलावले जात नाही. हिंजवडीतील एका शाळेसमोर बार आहे, हा बार बंद झाला नाही, तर उपोषणाला बसणार आहे.