

पुणे: राज्यात अकरावी प्रवेशाच्या तीन फेर्या पूर्ण झाल्या असून, चौथी फेरी सुरू झाली आहे. आत्तापर्यंत 8 लाख 11 हजार 731 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर प्रवेशासाठी अद्यापही 13 लाख 29 हजार 699 जागा रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. चौथ्या फेरीची गुणवत्ता यादी येत्या 1 ऑगस्टला जाहीर करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
अकरावी प्रवेशासाठी राज्यात 9 हजार 522 महाविद्यालयांमध्ये 17 लाख 67 हजार 42 जागा कॅप प्रवेशाच्या तसेच 3 लाख 74 हजार 388 जागा कोटा प्रवेशाच्या अशा एकूण 21 लाख 41 हजार 430 जागा उपलब्ध आहेत. (Latest Pune News)
त्यासाठी 14 लाख 31 हजार 980 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 6 लाख 73 हजार 371 विद्यार्थ्यांनी कॅपव्दारे तसेच 1 लाख 38 हजार 360 विद्यार्थ्यांनी विविध कोटाअंतर्गत अशा एकूण 8 लाख 11 हजार 731 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश घेतला आहे. आता प्रवेशासाठी कॅप प्रवेशाच्या 10 लाख 93 हजार 671 आणि कोटा प्रवेशाच्या 2 लाख 36 हजार 28 अशा एकूण 13 लाख 29 हजार 699 जागा उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तिसर्या फेरीत 1 लाख 11 हजार 235 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला आहे. कला शाखेच्या 20 हजार 963, वाणिज्य शाखेच्या 33 हजार 505, विज्ञान शाखेच्या 56 हजार 67 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यात आली आहे. तर 28 ते 29 जुलैदरम्यान चौथ्या फेरीसाठी महाविद्यालयांचे पसंतीक्रम (प्रवेश अर्जाचा भाग 2) विद्यार्थ्यांना नोंदवता येणार आहेत.
तसेच 1 ऑगस्टला प्रवेशाची गुणवत्तायादी जाहीर करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना 1 ते 2 ऑगस्ट दरम्यान प्रवेश निश्चित करता येणार आहे. तर 4 ऑगस्टला रिक्त जागा जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली आहे.