

Supriya Sule on Ajit Pawar Plane Crash: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेवरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही गंभीर आरोप केले. विशेषतः चर्चेत आलेल्या 'मफलर मॅन'च्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आता या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
रोहित पवार आणि अजित पवार यांच्यात अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होते. त्यामुळे अजितदादांच्या अपघाताबाबत रोहितच्या मनात अस्वस्थता असणे स्वाभाविक आहे. त्याच्या भावनांचा आपण आदर केला पाहिजे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. मात्र, या अपघाताचा तपास पूर्ण होऊन सत्य समोर येणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे तपासाच्या निष्कर्षाची वाट पाहिली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आज मंगळवारी (17 नोव्हेंबर) पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीनंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दाखवत विमान कंपनीच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला होता. या आरोपांबाबत विचारले असता सुप्रिया सुळे यांनी आपल्याला रोहित यांची संपूर्ण पत्रकार परिषद पाहता आली नसल्याचे सांगितले.
त्या म्हणाल्या की, काल सोनिया गांधी यांच्या पुस्तकाच्या कार्यक्रमासाठी आपण इंडिगोच्या विमानाने दिल्लीला जात होतो. त्यामुळे रोहित पवार यांनी नेमके काय मुद्दे मांडले, हे पाहता आले नाही. आज सकाळी पुण्यातील वर्तमानपत्रांमधून या पत्रकार परिषदेची माहिती मिळाली.
रोहित यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि शून्य एफआयआरबाबतची त्यांची नेमकी मागणी काय आहे, हे आपण त्यांच्याशी बोलून समजून घेणार आहोत. कोणत्याही विषयावर पूर्ण माहिती घेतल्याशिवाय प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवार आणि रोहित पवार यांच्यातील नात्याचा उल्लेख करत सुप्रिया सुळे यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली. रोहित आणि अजितदादांचे नाते अत्यंत प्रेमाचे होते. त्यामुळे या अपघाताबाबत त्याच्या मनात अनेक प्रश्न आणि अस्वस्थता असणे स्वाभाविक आहे. त्याच्या भावनांचा सन्मान केला पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
मात्र, विमान अपघाताचा तपास नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे कालमर्यादेत आणि पारदर्शक पद्धतीने चौकशी करण्याची जाहीर मागणी केली आहे.
त्यामुळे तपास पूर्ण होऊन अहवाल समोर येण्याची वाट पाहूया, अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली. माझा भाऊ गेला आहे, आमचा ब्रेकिंग न्यूजचा विषय नाही. सगळ्यांनीच संवेदनशील रहावं, मी हात जोडून विनंती करते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळे यांनी यावेळी भावाच्या निधनाच्या दुःखाचा उल्लेख करत, ही घटना माध्यमांसाठी ब्रेकिंग न्यूज बनवू नये, असं आवाहन केलं. या कठीण प्रसंगी सर्वांनी संवेदनशील रहावं, मी हात जोडून विनंती करते, सुप्रिया सुळे म्हणाल्या.
भाजप नेते नवनाथ बन यांनी रोहित पवारांच्या साखर कारखान्यातून निघणाऱ्या धुरामुळे विमान अपघात झाल्याचा आरोप केल्याची चर्चा आहे. याबाबतही सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना त्यांनी या आरोपाची आपल्याला सविस्तर माहिती नसल्याचे सांगितले. आधी संपूर्ण प्रकरण समजून घेणार आणि त्यानंतरच यावर बोलणार, असे त्यांनी स्पष्ट केले.