

इंदापूर: मंत्रालयात मोबाईलवर गेम खेळणारा पकडला गेला, त्याला आम्ही जबाबदार नाही. ते बसले होते त्यांच्या पाठीमागच्याच माणसाने व्हिडिओ काढला. याचा अर्थ व्हिडिओ तुमच्याच विचाराच्या माणसाने काढलाय. पण अब्रू नुकसानीची नोटीस मात्र आ.रोहित पवार यांना पाठवली आहे. व्हिडिओ आम्ही फक्त टि्वटरवर टाकलाय, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली.
इंदापूरमधील एका कार्यक्रमादरम्यान रविवारी (दि. 24) सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर माणिकराव कोकाटे प्रकरणावरून जोरदार टीका केली आहे. त्या म्हणाल्या, गंमत अशी झाली, की दत्तात्रय भरणे यांना शेती खाते गेले आणि कोकाटे यांना क्रीडा खाते मिळाले. पण आता खेळ करताना आम्ही केंद्रामध्ये कायदा पास केला. (Latest Pune News)
ज्या गेमवर पैसे लावले जातात ते ऑनलाइन सर्व खेळ या देशात बंद केले आहेत. केंद्र कायदा करते त्या वेळी ते प्रत्येक राज्यासाठी करते. राज्य सरकारने त्याचे नियम करावे लागतात; मात्र आता महाराष्ट्रात नियम करताना क्रीडामंत्री कोण? तसेच या कायद्याबाबत नियम कोण करणार, हा प्रश्न उपस्थित करत खा. सुळे यांनी हातामध्ये पत्ते खेळण्याची नक्कल केली.
मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे, की ज्या मंत्र्याला तुम्ही बदलले तो कामावर बसलेला असताना मोबाईलवर गेम खेळत होता. आता तेच केंद्र सरकारने बंदी आणलेल्या गेम्सबाबत नियम कायदे बनवणार आहेत. जो मुलगा वर्गात कॉपी करतो त्यालाच तुम्ही पेपर तपासायला बोलवता. आता या सरकारने हद्द केली, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला.