पुणे: अष्टविनायक संकल्पनेवरील मखर, केदारनाथ मंदिरापासून ते विविध काल्पनिक मंदिरांची प्रतिकृती, वेगवेगळ्या किल्ल्यांची प्रतिकृती, हुबेहूब साकारलेला शनिवारवाडा अन् कारंजे असलेले विविध डिझाईनमधील मखर... अशा नानाविध प्रकारच्या मखरांनी दालने सजली आहेत.
कागदी पुठ्ठ्यांपासून ते ग्रीन शीटपर्यंत तयार केलेल्या पर्यावरणपूरक मखर खरेदीलाही पुणेकरांकडून चांगला प्राधान्य देत आहेत. एलईडी दिव्यांची विद्युत रोषणाई असलेले मखर, प्राचीन मंदिरांसह गडकिल्ल्यांवर आधारित प्रतिकृतींसह मयुरासन, सिंहासन, ब्रह्मांडनायक आणि पालखी सोहळ्यावर आधारित मखर... असे मखरांचे विविध प्रकार लक्ष वेधून घेत आहेत. घरगुती गणपतीसाठी मखर खरेदी केले जात असून, रविवार पेठेतील बोहरी आळी, लक्ष्मी रस्ता, कॅम्प, खडकीसह विविध ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये मखर खरेदीला प्रतिसाद आहे. Ganesh Chaturthi
गणेशोत्सव सजावटीतील महत्त्वाचा भाग म्हणजे मखर... गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरल्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही नानाविध प्रकारातील मखर बाजारात खरेदीसाठी उपलब्ध असून, कागदी पुठ्ठा, लाकूड, ग्रीन शीटपासून तयार केलेल्या पर्यावरणपूरक मखर खरेदीला प्रतिसाद आहे. सिंहगड किल्ला, काल्पनिक मंदिरे, श्रीगणेश मंदिरांच्या प्रतिकृती, शिवमंदिरे असून, छोटे कारंजे असलेल्या मखरांना सर्वाधिक प्रतिसाद आहे. जास्वंद, गुलाब अशी वेगवेगळी फुले या प्रकारांसह विविध रंगसंगती असलेले मखरही लक्ष वेधत आहेत.
राजश्री दाहोत्रे आणि यामिनी दाहोत्रे म्हणाल्या, विविध प्रकारची पर्यावरणपूक मखरे यंदा उपलब्ध असून, कागदी पुठ्ठ्यापासून ते लाकडापासून तयार केलेले आमच्याकडे पाहायला मिळेल. काल्पनिक मंदिरांसह कारंजे असलेले मखरही लक्ष वेधून घेत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या आसनांचीही खरेदी होत आहे. मयूरासन, अष्टविनायक, ब्रह्मांडनायक अशा प्रकारच्या मखरांना सर्वाधिक मागणी आहे. 700 रुपयांच्या पुढे मखरांची किंमत आहे.
छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची राजमुद्रा असो वा गडकिल्ले... शिवकालीन इतिहास उलगडणारे मखरही पाहायला मिळतील. तसेच, वेगवेगळ्या रंगसंगती वापरून मखर तयार करण्यात आले आहेत. बासरी, एकदंत, मोरया, ओम या प्रकारातील मखरांसह वेगवेगळ्या पडद्यांपासून तयार केलेले मखरेही उपलब्ध आहेत.
आम्ही विविध प्रकारातील मखर तयार केले असून, वेगवेगळ्या प्रकारची विद्युत रोषणाई असलेल्या मखरांना चांगला प्रतिसाद आहे. वूडन शीटचा वापर करून तयार केलेल्या मखरांची खरेदी होत आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची राजमुद्रा ते गडकिल्ल्यांवर आधारित प्रतिकृतीही आम्ही तयार केल्या आहेत. पर्यावरणपूरक मखर खरेदीला लोक प्राधान्य देत आहेत.
- विद्या सावंत, व्यावसायिक. पडद्यांच्या मखरांचीही भुरळ