पुणे : खेड तालुक्यातील भांबोली गावामध्ये वडिलोपार्जित जागेतील काही हिस्सा बांधकाम व्यावसायिकाला विकला आहे. परंतु त्याने अनधिकृतपणे आमच्या जागेत यंत्रणेला हाताशी धरून चुकीच्या मोजणीद्वारे बेकायदेशीरपणे ताबा टाकून तेथे बांधकाम केले. ते बांधकाम पाडण्याचे आदेश भूमी अभिलेख विभाग व न्यायालयाने दिले असतानाही ते न पाडता उलट आमच्या कुटुंबियांवर बिल्डरने दडपशाही केली, असा आरोप किर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांनी शनिवारी (दि.5) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
चैतन्य महाराज वाडेकर यांच्यासह यांचे दोन भाऊ अॅड. अमोल आणि प्रमोद वाडेकर व नातेवाईक यांना म्हाळुंगे पोलिसांनी अटक केल्याच्या वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर चैतन्य वाडेकर यांनी त्यांची बाजू पुण्यातील पत्रकार भवन येथे त्यांची बाजू मांडली. याबाबत बोलताना वाडेकर म्हणाले, माझा अपंग भाऊ अॅड. अमोल वाडेकर यांना शारीरिक व्यंगावरून अपमानकारक वागणूक दिली. तसेच आमच्या जागेतील त्यांचे अतिक्रमण काढले असताना आमच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. मी प्रसिद्ध कीर्तनकार असल्याने मला बदनाम करण्याचा हा संबंधित बिल्डरचा कट असल्याचा आरोप ही त्यांनी यावेळी केला.
वाडेकर म्हणाले, पीएमआरडीएच्या भ्रष्ट अधिकार्यांचा बिल्डरला पाठिंबा असून संबंधीत बिल्डरकडून त्यांच्या जागेत अतिक्रमण केले आहे. तसेच एका कंपनीचा रस्ता उकरल्यामुळे अटक झाल्याच्या अर्धवट माहितीच्या आधारे बातम्या प्रसारित करण्यात आल्या. मात्र, यातून संबंधित बिल्डरकडून माझे नाव खराब करण्याचा हेतूने हा प्रकार घडला आहे. संबंधित बिल्डर तसेच पीएमआरडीएच्या अधिकार्यांबाबत शासनाने कोणतीच दखल घेतली नाही या सर्वांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.