ससूनमध्ये सुपरस्पेशालिटी नावालाच ! सुविधांच्या अभावामुळे गरीब रुग्णांची परवड

ससूनमध्ये सुपरस्पेशालिटी नावालाच ! सुविधांच्या अभावामुळे गरीब रुग्णांची परवड
Published on
Updated on

प्रज्ञा केळकर-सिंग : 

पुणे : ससून रुग्णालयामध्ये सर्वसामान्य गरीब रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुरेशा सुपरस्पेशालिटी सुविधा नाहीत. खासगी रुग्णालयांमधील खर्च परवडत नसल्याने रुग्णांना उपचारांपासून वंचित रहावे लागते. गुंतागुतींच्या आजारांवर मोफत व तातडीने उपचार मिळण्यासाठी आवश्यक सुविधा तातडीने मिळण्याची गरज दै. 'पुढारी'च्या पाहणीत आढळून आली आहे.

गोरगरीब रुग्णांना चांगले उपचार मोफत मिळावेत, यासाठी ससून रुग्णालयाची उभारणी झाली. काळातच्या ओघात इथे उच्च दर्जाची सुविधा व वेगवेगळे विभाग निर्माण झाले आहेत. गुंतागुंतीच्या आजारावर उपचारासाठी काही सुपरस्पेशालिटी विभागही आहेत. मात्र, ससून रुग्णालयात कॅन्सर रुग्णांसाठी स्वतंत्र रेडिएशन थेरपी विभाग नाही. कर्करोगाचे प्रमाण वाढता असताना समर्पित ऑन्कोलॉजी विभागाचीही नितांत गरज आहे. कुशल मनुष्यबळ नाही. सध्या दोन डॉक्टर आणि 3 परिचारिकांकडून ओपीडीमध्ये 4 तासांत 60-70 कर्करोगाच्या रुग्णांची तपासणी केली जाते. आणखी दोन कॅन्सरतज्ज्ञांची गरज आहे. स्वतंत्र कर्करोग विभाग सुरू झाल्यास महाविद्यालयात डॉक्टरांना प्रशिक्षित करता येईल. सध्या केमोथेरपीसाठी 15 खाटा असल्या तरी मागणी वाढत आहे.

या सुविधांचा अभाव ?
आयव्हीएफ, आययूआय सुविधा नाहीत. रुग्णालयात कार्डिओलॉजी, जठरांत्रमार्ग रोग विभाग (गॅस्ट्रॉइंटेरॉलॉजी), मेंदूविकार (न्यूरोलॉजी) व नेफ्रॉलॉजी विभाग, हृदयशल्यचिकित्सा विभाग (सीव्हीटीएस), प्लास्टिक सर्जरी, मेंदूशल्यचिकित्सा (न्यूरोसर्जरी), मूत्रविकार (युरोलॉजी) व बालशल्यचिकित्सा (पेडियाट्रिक सर्जरी) या शल्यसुविधा काही अंशीच पुरविल्या जातात. कारण त्यासाठी स्पेशालिस्ट, सुपरस्पेशालिस्ट मनुष्यबळाची पदेच मंजूर नाही.

'ससून'शी संलग्न असलेल्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रमही सुरू होणे आवश्यक आहे.
एमसीएच या सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रमास मान्यता मिळालेले प्लास्टिक सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी विभागही पूर्णवेळ अध्यापकांअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

खासगी रुग्णालयांच्या तुलनेत सरकारी रुग्णालयांमध्ये कमी पगार असल्याने डॉक्टर भरतीच्या प्रक्रियेला प्रतिसाद मिळालेला नाही. सुपरस्पेशालिटी विभागाच्या विस्तारीकरणाची फाईल मंजुरीसाठी पाठविली आहे. कर्करोगासाठी ससूनमध्ये जनरल मेडिसिनअंतर्गत दोन कॅन्सरतज्ज्ञ नियुक्त आहेत. मात्र, अद्याप स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आलेला नाही. स्वतंत्र विभागासाठी प्रस्ताव पाठवला असला तरी त्यासाठी आवश्यक डॉक्टर आणि कर्मचारी मिळणे आवश्यक आहे.
                          – डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, ससून सर्वोपचार रुग्णालय.

पूर्णवेळ बालरोग शल्यचिकित्सक नाही
रुग्णालयात लहान मुलांच्या शस्त्रक्रिया विभागात एकही पूर्णवेळ बालरोग शल्यचिकित्सक नाही. त्यामुळे सुपरस्पेशालिटी विभाग असूनही शस्त्रक्रिया खोळंबून राहात असून बाहेरील रुग्णालयांतील डॉक्टरांवरच अवलंबून राहावे लागत आहे. पूर्णवेळ डॉक्टरांच्या पदासाठी रुग्णालयाकडून शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news