उन्हाळ्याच्या सुटीत तरुणाई भटकंतीला! नाइट कॅम्पिंग अन् नाइट ट्रेकला प्रतिसाद

उन्हाळ्याच्या सुटीत तरुणाई भटकंतीला! नाइट कॅम्पिंग अन् नाइट ट्रेकला प्रतिसाद

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गडकिल्ल्यांची भटकंती… निसर्गरम्य ठिकाणांची भटकंती… जंगलातील भटकंती… असे सारे काही आता तरुणाईला खुणावू लागले असून, उन्हाळ्याच्या सुटीत महाविद्यालयीन तरुणाई भटकंतीसाठी विविध ठिकाणी ग्रुपसोबत जात आहे. त्यामुळे विविध पर्यटन संस्थांकडून पवणा, वरसगाव, मुळशी, भंडारदरा आदी धरण परिसरांसह लोणावळा, महाबळेश्वर, वाई आदी ठिकाणी नाइट कॅम्पसचे आयोजन केले जात आहे.

निसर्गरम्य ठिकाणी टेंटमध्ये राहणे, भोजनासह संगीत, विविध खेळ, अशा विविध सुविधा असणार्‍या नाइट कॅम्पिंगकडे तरुणाईचा कल वाढला आहे. त्याशिवाय विविध गडकिल्ल्यांच्या परिसरात नाइट ट्रेकही होत असून, त्यातही तरुण सहभागी होत आहेत. कोकण भागासह नाशिक, कोल्हापूर, सातारा आदी जिल्ह्यांसह निसर्गरम्य ठिकाणी तरुणाई भटकंतीसाठी जात असून, जम्मू-काश्मीरसह लडाख, केरळ, पश्चिम बंगाल, राजस्थान, गुजरात आदी ठिकाणेही तरुणाईला खुणावत आहेत.

गेल्या काही वर्षांत तरुणाईचा फिरस्तीकडे ओढा वाढला आहे. खासकरून महाविद्यालयीन तरुणाईही विविध ठिकाणी फिरायला जाण्यास प्राधान्य देत असून, त्यामुळेच नाइट ट्रेकसह नाइट कॅम्पिंगलाही त्यांचा प्रतिसाद आहे. नाइट कॅम्पसचे संयोजन करणारे आलोक देशपांडे म्हणाले, सध्या नाइट कॅम्पिंग आणि नाइट ट्रेकला तरुणाईचा प्रतिसाद आहे. विशेषत: आत्ताच्या सीझनमध्ये काजवा महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. धरणकाठासह रात्रीच्या ट्रेककडे तरुणाईचा ओढा आहे. आम्हीही काही नाइट कॅम्पसचे आयोजन करीत आहोत. नाइट कॅम्पिंगमध्ये 30 ते 35 जणांचा सहभाग असतो.

धरण परिसरात असे नाइट कॅम्पस होत असून, निसर्गरम्य ठिकाणी टेंटमध्ये राहणे, भोजनासह संगीत, विविध खेळ अशा विविध सुविधा असणार्‍या नाइट कॅम्पिंगकडे तरुणाईचा कल आहे. सुबोध वैशंपायन म्हणाले, सध्याचा सीझनमध्ये काही ठिकाणी रात्री काजवे दिसतात. ते पाहण्याची तरुण-तरुणींमध्ये क्रेझ असते. धरण परिसरात आणि काही गावांमध्ये असे काजवा महोत्सव होत असून, रात्रीच्या वेळी काजवे पाहण्यासाठीच्या उत्सुकतेमुळे अनेक जण नाइट कॅम्पमध्येही सहभागी होतात. यासोबतच नाइट ट्रेकलाही प्रतिसाद आहे. विविध ठिकाणी ग्रुपसोबत ट्रेक केला जात आहे.

ट्रॅव्हल कंपन्यांकडूनही वेगवेगळे आकर्षक पॅकेज

वेगवेगळ्या ट्रॅव्हल कंपन्यांकडूनही ट्रॅव्हल पॅकेज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यात वेगवेगळ्या ठिकाणी सात ते आठ दिवसांच्या राहण्याच्या सुविधेसह विविध ठिकाणी फिरण्याचीही व्यवस्था उपलब्ध आहे. अशाच ट्रॅव्हल पॅकेजचे बुकिंग करून तरुण-तरुणी भटकंतीला निघत आहेत. अगदी जंगल सफारीपासून ते हिमालयीन ट्रेकपर्यंतची सुविधा यात करण्यात आली असून, खासकरून हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, लडाख आदी ठिकाणी फिरायला जाण्यास प्राधान्य दिले जात आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news