

मिलिंद शुक्ल
पिंपरी : दहा वर्षांच्या आतील मुलींसाठीची केंद्र सरकारची सुकन्या योजना ही आईवडिलांना थोड्या रकमेच्या ठेवींच्या बदल्यात मोठी रक्कम 21 व्या वर्षी मॅच्युरिटीच्या दिवशी देऊन मदतीचा हात देते. शिवाय त्याआधी उच्च शिक्षण किंवा लग्न यापैकी जे अगोदर येईल त्या वेळी जमा रकमेपैकी 50 टक्के रक्कम प्राप्त करता येते, अशी माहिती टपाल खात्याच्या अधिकार्यांनी दिली.
वर्षभरात 7 हजार खाती
पिंपरी चिंचवड शहरातील कन्यांनी समृद्धी योजनेला चांगला प्रतिसाद दिला आहे. टपाल खात्याच्या शहरातील 16 कार्यालयांमधून चालू आर्थिक वर्षात सुमारे 7129 एवढी खाती तयार करण्यात आली आहेत. मुलींच्या भविष्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी आणि विवाहासाठी आईबापाला काहीतरी पैशांची तरतूद करता यावी म्हणून केंद्र सरकारने 'मुलगी शिकली प्रगती झाली', असे म्हणत 'सुकन्या समृद्धी योजना' ही लघु बचत योजना आणली. मुलगी 21 वर्षांची झाल्यानंतर या योजनेचा फायदा मुलीला मिळतो. मुलीच्या शिक्षण आणि लग्नाच्या खर्चासाठी या योजनेचा विशेष फायदा होईल.
15 वर्षे न चुकता भरा पैसे
मुलीच्या जन्मानंतर पहिल्या 10 वर्षातच सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खातं उघडणं बंधनकारक आहे. एका पालकाला दोन मुलींसाठी खाती उघडता येतील. खातेदार भारताचा नागरिक असणंही आवश्यक असून खातं केवळ मुलीच्या नावानंच उघडलं जाऊ शकतं. दरमहा या खात्यात किमान 250 रुपये भरून खातं उघडावं लागेल. त्यानंतर वर्षाकाठी दीड लाखांपर्यंत त्या खात्यात रक्कम जमा करता येईल. खातं उघडल्यानंतर पुढील 15 वर्षे कधीही न चुकता या खात्यात पैसे भरणं आवश्यक आहे. खाते उघडल्याच्या 21 वर्षांनंतर योजनेची मुदत संपेल आणि त्याचे पैसे खातेदाराला मिळतील. दरम्यान, 18 व्या वर्षी जर मुलीचे लग्न ठरले तर त्यासाठी या खात्यातून जमा रकमेतून 50 टक्के पैसे काढू शकतो.
डिपॉझिटवर जमा होते व्याज
सुकन्या कन्या योजनेअंतर्गत खातं भारतातील कुठल्याही टपाल कार्यालयातून उघडता येईल. मुलगी लग्नाच्या कायदेशीर वयाची झाल्यानंतर यात ठेवलेली रक्कम खर्चासाठी वापरता येईल. मुलीच्या वयाच्या 21 वर्षांपर्यंत तुमच्या डिपॉझिटवर व्याज जमा होत राहतं. शिवाय, त्यात तुम्ही महिन्यात किंवा वर्षभरात कितीही वेळा त्यात पैसे भरू शकता. मुलीच्या 21 व्या वर्षांनंतरही जर यातले पैसे काढले नाही, तर त्या पैशांवरील व्याज नियोजित दरानं वाढतच जाते.
खाते कुठूनही वापरू शकता
खाते कुठल्याही शहरातील टपाल कार्यालयात उघडले आणि इतर ठिकाणी स्थलांतर झाल्यास तेथील टपाल कार्यालयात पैसे भरता येतील. मॅच्युरिटीनंतर पैसेही काढता येईल. तेथील कर्मचार्याच्या मदतीनं तुम्ही खाते उघडू शकता. खातं उघडण्याआधी तुम्हाला अर्जातील सर्व माहिती भरावी लागेल. ओळखपत्र बंधनकारक आहे. मुलीचा आधार कार्ड, जन्मदाखला पत्ता म्हणून वापरता येईल. ही सर्व कागदपत्रं अर्जासोबत जोडल्यानंतर तो अर्ज टपाल कार्यालयात जमा करा.
चक्रवाढ व्याजामुळे रक्कम वाढते
या योजनेत खातेदाराला त्याच्या रकमेवर चक्रवाढव्याजदराने रक्कम मिळत असल्याने मॅच्युरिटीच्या वेळी ही रक्कम जास्त पटींनी वाढते. कधीही न चुकवता खातेदारानं या योजनेत पैसे भरत राहिल्यास योजनेची मुदत संपल्यानंतर मोठी रक्कम मिळू शकते. शिवाय मुदतीनंतर मिळणार्या रकमेवर कर भरावा लागणार नाही. या योजनेमुळे गरीब कुटुंबांसह उच्च मध्यमवर्गीय, मध्यम वर्गीय आणि दारिद्यरेषेखालील असलेल्यांना फायदा होईल. ही लाँग टर्म स्कीम आहे. त्यामुळेच वार्षिक व्याजाची पद्धत ही चक्रवाढ व्याजाची आहे. पर्यायाने परत मिळणारी रक्कमही वाढते.
अटी आणि नियम…
जर सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यात किमान रक्कम 250 रुपये डिपॉझिट केली नाही, तर अकाऊंट 'डफॉल्ट अकाऊंट' म्हणून होते.
मात्र, हे अकाऊंट 250 रुपये भरून पुन्हा सुरू करता येईल. त्यासाठी, त्यासोबत अधिकचे 50 रुपये भरावे लागतील.
जिच्या नावाने अकाऊंट आहे, त्या मुलीचं वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ती स्वत: अकाऊंट हाताळू शकते.
18 वर्षांनंतर अकाऊंट मुदतपूर्वी बंदही करता येऊ शकतं.
जर दर महिन्याला 1,000 रुपये न चुकता भरलेत, तर मॅच्युरिटीवेळी जवळपास 5 लाख रुपये मिळतील. जर तुम्ही 15 वर्षे दर महिन्याला न चुकता 12,500 रुपये भरलेत, तर मॅच्युरिटीवेळी 71 लाख रुपये मिळतील. जर तुम्ही 15 वर्षे वर्षाकाठी न चुकता 60,000 रुपये भरलेत, तर तुम्हाला मॅच्युरिटीवेळी 28 लाखांहून अधिक रक्कम मिळेल. मात्र, ही रक्कम मॅच्युरिटीच्या वेळी जो व्याजदर असेल, त्यानुसार थोडीफार बदलू शकेल.
सुकन्या समृद्धी योजनेचे खाते हे शहरातील कुठल्याही टपाल कार्यालयात काढता येऊ शकते. तसेच कुठल्याही टपाल कार्यालयात तुम्ही दरमहा याचे पैसे भरू शकतात. तसेच काढण्याचीही पद्धती सोपी आहे. या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्या, आपल्या लाडक्या लेकीचे भवितव्य घडवा.
-नितीन बने, जनसंपर्क डाक निरीक्षक, पिंपरी मुख्यालय